सशस्त्र दरोडा: ३० हजारांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:42 AM2021-09-02T04:42:04+5:302021-09-02T04:42:04+5:30
अकोटः अकोट शहरात भरदिवसा टाकलेल्या सशस्त्र दरोड्यात घरातील तिघांचे जीव वाचले असून, पोलिसांनी परिसरातील सीसी कॅमेऱ्याचे फुटेज ...
अकोटः अकोट शहरात भरदिवसा टाकलेल्या सशस्त्र दरोड्यात घरातील तिघांचे जीव वाचले असून, पोलिसांनी परिसरातील सीसी कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असून, त्या अनुषंगाने संशयित महिला दरोडेखोरांची छायाचित्रांच्या आधारे शहानिशा सुरू केली आहे. या घटनेत केवळ २९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे.
शहरातील बुधवार वेस परिसरात राहणारे प्रसिद्ध व्यापारी अमृतलाल सेजपाल यांच्या निवासस्थानी दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता दरम्यान कोरोना लसीकरण चौकशी पथक असल्याचे बनाव करुन तीन महिला व तीन पुरुष घरात घुसून वयोवृद्ध अमृतलाल सेजपाल, इंदुबहन सेजपाल, देलिशा यांना मारहाण करीत तोंडात बोळे कोंबत चिकटपट्ट्या लावल्या. तसेच दोरीने हातपाय बांधून एका खोलीत डांबून ठेवले. सुदैवाने या तिघांचे सशस्त्र दरोड्यात प्राण वाचले आहेत. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी परिसरातील व शहरातील काही भागातील सीसी कॅमेऱ्याची फुटेज पाहिले. त्यामध्ये तीन महिलांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यांचा चेहरा स्कार्फने झाकलेला असल्याचे आढळले आहे. पोलिसांनी सीसी कॅमेरा फुटेजच्या आधारे ओळख पटविण्यासाठी शहानिशा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर सीसी कॅमेऱ्याच्या फुटेजमधील छायाचित्रे टाकण्यात आली आहेत. कपड्यावरुन संबंधितांची माहिती मिळाल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दरोड्यात २७ हजारांचा मोबाइल व दोन हजार ७०० रुपये रोख लंपास झाले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
-------------------------------नियोजनबद्ध दरोड्याचा घाट?
दरोडेखोरांनी सेजपाल कुटुंबातील तिघांना बांधून ठेवलेली पांढरी दोरी नवीन असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे तोंडात कोंबलेले कापसाचे बोळे, चिकटपट्ट्या व दोरी नव्यानेच विकत घेतल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. या परिस्थितीवरुन दरोडेखोरांनी नियोजनबद्ध दरोड्याचा घाट रचल्याचे प्रथमदर्शनी वाटत आहे.
---------------------