खदानमध्ये दोन समुदायात सशस्त्र हाणामारी
By admin | Published: November 16, 2016 02:10 AM2016-11-16T02:10:38+5:302016-11-16T02:10:38+5:30
आठ जखमी; २२ जणांवर गुन्हे दाखल; मुलांच्या वादातून मोठे भिडले
अकोला, दि. १५- खदान परिसरातील जेतवन नगरात लहान मुलांच्या वादातून दोन समुदायामध्ये सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या हाणामारीत आठ जण जखमी झाले असून, पोलिसांनी २२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर सवरेपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. परिस्थिती नियंत्रणात असून, या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जेतवन नगरातील रहिवासी मो. रहीम मो. आरीफ यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार लहान मुलांमध्ये सुरू असलेल्या वादातून मुकेश कुर्मी, अनिल कुर्मी, हेमा, लक्ष्मी, ऋषभ हिवराळे, आकाश धवसे, रतन धवसे, अरविंद भगत आणि मनोज शिंदे यांनी मो. रहीम यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांना बेदम मारहाण केली. यासोबतच सशस्त्र हल्ला चढविला. यावरून सदर नऊ जणांविरुद्ध खदान पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम १४७, १४८, १४९, ३२४, ३0७ आणि ऑर्म्स अँक्टच्या कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल केला आहे, तर अनिल कुर्मी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मो. शरीफ मो. आरीफ, मो. रशीद मो. आरीफ, फारुख, जाकीर, मुन्ना, साबीर, आसिया परवीन, बेबी, नन्ही, लाला की पत्नी, राजा कांबळे ऊर्फ लखन आणि शाहरुख यांनी अश्लील शिवीगाळ करीत सशस्त्र हल्ला चढविला. यामध्ये काही जण जखमी झाले. या तक्रारीवरून खदान पोलिसांनी १२ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १४७, १४८, १४९, ३२४, ३0७ आणि ऑर्म्स अँक्टच्या कलम ४, २५ सह अँट्रॉसिटी अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत दोन्ही गटांतील आठ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींची धरपकड सुरू केली आहे.