सेना पाचही नगरपालिका स्वबळावर लढणार!
By admin | Published: November 6, 2016 02:11 AM2016-11-06T02:11:13+5:302016-11-06T02:11:13+5:30
शिवसेना-भाजपची युती होण्याची आशा मावळल्याने शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली.
अकोला,दि. ५-स्थानिक नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी शिवसेना सज्ज असून यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होण्याची आशा मावळल्याने शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली. सेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांनी सेनेच्या जिल्हा तसेच शहर कार्यकारिणीत फेरबदल करून नवीन कार्यकारिणीचे गठन केले. जिल्हाप्रमुखपदी नितीन देशमुख व इतर पदाधिकार्यांच्या नियुक्त्या केल्यानंतर जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने पहिल्यांदाच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात नगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती असली तरी भाजपच्या दिरंगाईमुळे जिल्हापातळीवर युतीची घोषणा होण्यास विलंब झाला. तोपर्यंत इच्छुक उमेदवारांना ह्यएबीह्णफॉर्मचे वाटप झाले होते. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील पाच नगरपालिकांची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून त्यासाठी शिवसैनिक सज्ज असल्याची माहिती आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली. शिवसेनेची पाळेमुळे जिल्हय़ात खोलवर रुजली असून आम्ही प्रत्येक नगरपालिकेत स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. युती करण्यासाठी शिवसेनेकडून कोणतीही अडचण नव्हती. त्यामुळे युतीसाठी कोणी झुलवत ठेवले, याची सर्वांना जाण आहे. यंदा नगरपालिका निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सेनेचे माजी आमदार संजय गावंडे, सहायक संपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, अकोला पूर्वचे उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकार, बाळापूर-पातूरचे रवींद्र पोहरे, अकोट-तेल्हारा तालुक्याचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, महिला संघटिका ज्योत्स्ना चोरे, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, बाश्रीटाकळी तालुका प्रमुख गजानन मानतकर, मूर्तिजापूर-अप्पू तिडके, विनायकराव गुल्हाने, तेल्हारा-विजय मोहोड, संतोष अनासने, अकोला पूर्वचे शहर प्रमुख अतुल पवनीकर, प्रदीप गुरुखुद्दे, गजानन बोराळे, सुनीता मेटांगे आदी उपस्थित होते.
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी युती नाही!
नगरपालिका निवडणुकीसाठी युती फिस्कटली. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये युती होणार किंवा नाही, याबद्दल पक्षश्रेष्ठींकडून अद्यापपर्यंत कोणताही आदेश मिळाला नाही. सेनेकडूनही पदवीधरची निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी सांगितले. यापूर्वी पाच नगरपालिकांमध्ये सेनेचे केवळ तीन नगरसेवक होते. यंदा नगरसेवकांच्या संख्येत निश्चित वाढ होण्याचा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.
दगाबाजी झाली!
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेची मजबूत पकड आहे. त्याचा काही राजकीय पक्षांनी स्वार्थापुरता वापर केला आणि नंतर दगाबाजी केली. केंद्रात किंवा राज्यात कोणतीही लाट येवो, सुनामी फार काळ टिकत नसल्याचे माजी आ. संजय गावंडे यांनी सांगितले.
वाघ शेवटी वाघच असतो!
शिवसेनेचा ढाण्या वाघ कसा आहे, हे सांगण्याची गरज नाही. जंगलातील किंवा जंगलाच्या बाहेरचे किती वाघ कमी झाले, याची मोजदाद करण्यापेक्षा वाघ शेवटी वाघच असतो, असा टोला आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी भाजप नेत्यांचे नाव न घेता लगावला.