सेनेच्या पॅनलने भाजपच्या पॅनलचा उडवला धुव्वा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:19 AM2021-01-20T04:19:53+5:302021-01-20T04:19:53+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील शिरपूर-चांगेफळ गट ग्रामपंचायतीत सेनेच्या पॅनलने भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडवून दिला आहे. शिरपूर-चांगेफळ गट ग्रामपंचायतमध्ये गेल्या ...
खेट्री : पातूर तालुक्यातील शिरपूर-चांगेफळ गट ग्रामपंचायतीत सेनेच्या पॅनलने भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडवून दिला आहे. शिरपूर-चांगेफळ गट ग्रामपंचायतमध्ये गेल्या १९९५ पासून भाजपाच्या पॅनलची सत्ता होती, परंतु २५ वर्षांपासून गावाचा विकास ठप्प झाला होता. गावात चौकाचौकांत सांडपाणी, घाणीचे साम्राज्य व घरकुलांमध्ये घोटाळा तसेच विविध कामांमध्ये भ्रष्टाचारामुळे गावात संतापाची लाट उसळल्याचे चित्र होते. गावाचा विकास व्हावा या उद्देशाने शिरपूर येथील युवा मोहम्मद आसिफ यांनी गावातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांनी आमदार नितीन देशमुख यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये साथ दिली. आता शिरपूरला शिवसेनेचा गड बनविला. सुरुवातीला ग्रामस्थांचे कामे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर निवडणुकीमध्ये पॅनल उभे करून उडी घेतली. नऊ जागांसाठी नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. गावात प्रचार करून मतदारांचे मने जिंकून नऊ पैकी नऊ उमेदवार निवडून आणले. त्यामुळे गावासह परिसरात मोहम्मद आसिफ यांचे कौतुक होत आहे. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये नाहिदा अंजूम, नूर जहा, यासमिन परविन, रूपाली काळे, विमल चौरे, शेख रुस्तम, लाल शाह, आमिर खा, किरण काळे यांचा समावेश आहे. आता गावाचा विकास होतील अशी ग्रामस्थांना आशा आहे. घरकुल व विकासकामांच्या निधीमध्ये अपहार व गावातील विकास खुंटल्याने तसेच गावाचा विकास करण्याच्या हेतूने जनतेने नऊ पैकी नऊ उमेदवार निवडून दिले आहे. आम्ही नक्की गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करू असे मो. आसिफ शिवसेना पॅनलप्रमुख, शिरपूर यांनी सांगितले.
(फोटो) वा.प्र. ८ बाय १२