रेल्वे, बस स्थानकावर प्रवाशांच्या हात धुण्याची व्यवस्था करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 02:16 PM2020-03-18T14:16:49+5:302020-03-18T14:17:06+5:30
बसस्थानकांवर प्रवाशांचे हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी.
अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील रेल्वे स्थानक राज्य परिवहन महामंडळाचे बस स्थानक व खासगी लक्झरी बसस्थानकांवर प्रवाशांच्या हात धुण्याची व्यवस्था करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी संबंधित यंत्रणांना दिला.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, खासगी लक्झरी बसस्थानक व अकोला शहर बस सेवा अंतर्गत बसस्थानकांवर प्रवाशांचे हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. बसमध्ये येणारे प्रवासी बसमधून उतरल्यानंतर हात हात धुऊन बाहेर जातील आणि हात धुतल्यानंतर प्रवासी गाडीमध्ये चढतील यासंदर्भात उपाययोजना करण्यासह प्रवाशांना कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृतीचे पत्रक देण्यात यावे तसेच जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर प्रवासी उतरल्यानंतर प्रत्येक फलाटावर प्रवाशांच्या हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी व प्रवाशांच्या जनजागृतीसाठी रेल्वे स्थानकारवर फ्लेक्स बोर्ड लावण्यात लावण्यात यावे, असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणांना दिला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
बसेस, रेल्वे स्थानकाचे निर्जंतुकीकरण करा!
सर्व बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे आणि दररोज बसेस स्वच्छ करण्यात याव्या. तसेच रेल्वे स्थानकाचे निर्जंतुकीकरण करून स्वच्छता राखण्याची दक्षता घेण्यात यावी, असा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक, खासगी लक्झरी बसस्थानक, मनपा आयुक्त व रेल्वे स्थानकाच्या प्रबंधकांना दिला.