'ओबीसींना उध्वस्त करण्याची व्यवस्था निर्माण केली जातेय'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 10:14 PM2021-10-16T22:14:33+5:302021-10-16T22:15:36+5:30
राज्य सरकारच्या मनात आणि विचारातच ओबीसी आरक्षणाचा विरोध असेल तर कोणतेही कारण शोधता येते. यामुळे ओबीसी समाजाने आरक्षण विरोधी पक्षांना धडा शिकवला पाहिजे असे प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच म्हटलं होतं.
अकोला - ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. ओबीसींना उध्वस्त करण्याची व्यवस्था निर्माण केली जात आहे, कायद्याने आणि अनेक निर्णयांनी ओबीसी संपविण्याचे काम केले जात असल्याचा आरोप अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. धम्म चक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्य सरकारच्या मनात आणि विचारातच ओबीसी आरक्षणाचा विरोध असेल तर कोणतेही कारण शोधता येते. यामुळे ओबीसी समाजाने आरक्षण विरोधी पक्षांना धडा शिकवला पाहिजे असे प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. केंद्र सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटामध्ये त्रुटी असल्यामुळे देता येणार नाही असे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला डेटा गोळा करण्याची सूचना दिली आहे. परंतु राज्य सरकार जातीनिहाय जनगणना का करु शकत नाही, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम, अकोला
— Prabuddh Bharat (@PrabuddhBharat2) October 16, 2021
प्रमुख मार्गदर्शक - ऍड प्रकाश आंबेडकरhttps://t.co/NcUytxlcqd@Prksh_Ambedkar
वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी समाजाने आरक्षण विरोधी पक्षाला धडा शिकवण्याचे आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जर महाविकास आघाडी सरकारने शिकवले तर राज्यात जातीनिहाय जनगणना करु शकतात. त्या राज्य सरकारने केवळ केंद्र सरकार आणि जनगणना आयोगाला कळवले पाहिजे की आम्ही जनगणनेचा खर्च उचलायलाय तयार आहोत. परंतु राज्य सरकार हे करण्यासाठी तयार नसल्याचेही आंबेडकर यांनी यापूर्वीच म्हटलं आहे.
पंकजा मुंडेनीही साधला होता निशाणा
ओबीसी ( OBC Reservation ) व मराठात ( Maratha Reservation ) आरक्षणावरून भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. पण ओबीसी मराठा एकच आहे. मी दोन्ही प्रश्न लावून धरणार आहे. मी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, अशी ग्वाही माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ( Pankaja munde ) यांनी सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यात दिली. तसेच ओबीसींना न्याय मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही. मराठा आरक्षण भेटल्या शिवाय हार स्वीकारणार नाही, अशी घोषणाही यावेळी पंकजा यांनी केली.