‘परमवीरसिंग प्रकरणातील पाचही व्यक्तींना अटक करा!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:23 AM2021-04-30T04:23:33+5:302021-04-30T04:23:33+5:30
अकोला : वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराज ऊर्फ भीमराव घाडगे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग व त्यांची पत्नी, ...
अकोला : वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराज ऊर्फ भीमराव घाडगे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग व त्यांची पत्नी, दोन अंगरक्षक, राजू अय्यर या पाचही व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली आहे. या सर्वांना राज्य सरकारने तत्काळ अटक करून चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
अकोला पोलीस नियंत्रण कक्ष येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराज उर्फ भीमराव घाडगे यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे १४ पानी लेखी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीमध्ये त्यांनी परमवीरसिंह यांच्या कार्यकाळात सिंह यांनी अनेक श्रीमंत गुन्हेगारांना सोडून देण्याचा दबाव आणला होता. त्यांचे न ऐकल्याची शिक्षा म्हणून घाडगे यांना अनेक खोट्या गुन्ह्यात अडकवून अडचणीत आणले होते. परमवीरसिंह यांनी पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून गुन्हेगारांना पाठबळ देऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप या तक्रारीत घाडगे यांनी केला आहे. घाडगे यांच्या तक्रारीवर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग व त्यांची पत्नी सविता सिंग, अंगरक्षक प्रिन्सेस डिसिल्वा, प्रशांत पाटील व एजंट राजू अय्यर या पाचही जणांना राज्यशासनाने अटक करून उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हा दाखल करावा, असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आले. निवेदनावर आशाताई मिरगे, सैयद युसूफ अली, अमर डिकाव, अनिल बोराखडे, फजलू पैलवान, अनिल मालगे, मोहम्मद साबिर, वसीम भाई, महबूब मतवाले, शौकात अली आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.