पेट्रोल-डिझेलची अवैधरित्या विक्री करणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:19 AM2021-04-07T04:19:03+5:302021-04-07T04:19:03+5:30
दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई हातरून येथे सुरू होता काळाबाजार अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातरुन या गावात पेट्रोल ...
दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई
हातरून येथे सुरू होता काळाबाजार
अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातरुन या गावात पेट्रोल व डिझेलची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्षाने सोमवारी रात्री छापा टाकून एकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे सहा लाख रुपयांचा पेट्रोल, डिझेलचा साठा जप्त करण्यात आला आहे.
हातरून येथील रहिवासी अफसर शाह इस्माईल शाह (वय ३० वर्ष) हा एमएच ३४ एजी ३४९६ क्रमांकाच्या वाहनांमधून पेट्रोल व डिझेलची अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून विलास पाटील यांनी हातरुन या गावात तीन दिवस पाळत ठेवून पेट्रोल व डिझेलची अवैधरित्या विक्री सुरू असताना सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला. या ठिकाणावरून सुमारे ४०० लिटर डिझेल तर २०० लिटर पेट्रोल व एक ट्रक असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंधनाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली. गायगाव येथे पेट्रोल, डिझेल डेपो असून या ठिकाणावरून निघणाऱ्या टँकरमधून पेट्रोल व डिझेलची चोरी करून या परिसरातील गावातून त्याची अवैधरित्या विक्री करण्यात येत असल्याचे वास्तव आहे. हातरुन या गावातून जप्त केलेले डिझेल, पेट्रोल कुठून आणण्यात आले याचाही शोध पोलीस घेत आहेत. यावरून आताही गायगाव येथील डेपोतून निघणाऱ्या टँकरमधून पेट्रोल व डिझेलची चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, हातरुन या गावातून अटक करण्यात आलेल्या अफसर शाह इस्माईल शाह यास अटक करून त्याच्याविरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.