विद्युत तार चोरी करणारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:34 AM2021-03-13T04:34:12+5:302021-03-13T04:34:12+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तीन गुन्ह्यांची उकल अकोला : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहीगाव गावंडे येथून विद्युत ...
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तीन गुन्ह्यांची उकल
अकोला : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहीगाव गावंडे येथून विद्युत तारांची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी जुने शहरातून अटक केली. या चोरट्यांकडून ३० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
महावितरण कंपनीच्या अभियंता हेमलता पाटील यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार विद्युत विभागाच्या तारा अज्ञात चोरट्यांनी दहिगाव गावंडे शेत शिवारातून चोरी केल्याची तक्रार बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी जुने शहरातील रमाबाई आंबेडकर नगर येथील रहिवासी अल्पेश पंजाबराव अजने वय २९ वर्षे व मनीष समाधान शिरसाठ वय ४२ वर्षे यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता या दोघांनी ही चोरी त्यांचा तिसरा साथीदार अक्षय दारोकार राहणार उरळ याच्यासोबत केल्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी आणखी तपास केला असता या तीन चोरट्यांनी बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. या चोरट्यांनी चोरीची तार सुभाष चौकातील मोहम्मद सलीम मोहम्मद मलीक याला विक्री केल्याची माहिती समोर आलेली आहे. पोलिसांनी अटकेतील दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना पुढील तपासासाठी बोरगाव मंजू पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या चोरट्यांकडून ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राजपाल ठाकूर, गणेश पांडे, नितीन ठाकरे, शंकर डाबेराव, फिरोज खान, संदीप काटकर, संदीप तवाडे, विशाल मोरे, लीलाधर खंडारे, रवी पालीवाल, गोपाल पाटील, रोशन पटले, सुशील खंडारे, सतीश गुप्ता यांनी केली.