विघ्नहर्त्याचे थाटात आगमन; घरोघरी बाप्पा विराजमान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 04:02 PM2020-08-22T16:02:33+5:302020-08-22T16:02:54+5:30
शनिवारी सकाळी घराघरांत बाप्पांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
अकोला : अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेले गणपती बाप्पा शनिवार, २१ आॅगस्ट गणेश चतुर्थीच्या पवित्र मुहूर्तावर घरोघरी विराजमान झाले. लाडक्या बाप्पांना घरी घेऊन येण्यासाठी शुक्रवारपासूनच भाविक व बच्चे कंपनीने अकोल्याच्या बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. शनिवारी सकाळी घराघरांत बाप्पांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावर्षी कोरोनाच्या संसर्गाच्या पृष्ठभूमीवर सर्वच सण-उत्सव कोणताही मोठा गाजावाजा न करता साजरे करण्यात येत आहेत. गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असल्यामुळे यावर्षी प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अटी-शर्तींच्या अधिन राहून परवाणगी देण्यात आली आहे. चार फुटांपेक्षा मोठी मुर्ती नसावी, कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन, अशा अटींची पूर्तता करण्याचे बंधन घालून देण्यात आले आहे. कोरोनाचे सावट असले तरी भाविकांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत आहे. शुक्रवारी दिवसभर व शनिवारी सकाळीही गणेशमुर्ती खरेदी करण्यासाठी येथील क्रिक्रेट क्लबच्या मैदानात उभारण्यात आलेल्या बाजारात मोठी गर्दी केली होती. यावर्षी गणेशमुर्तींच्या किमती वाढल्या आहेत. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मुर्तींपेक्षा शाडू मातीच्या मुर्ती महाग असल्यातरी भाविकांची पसंती शाडू मातीच्या मुर्तींना असल्याचे दिसून आले आहे. बाप्पांची आरास करण्यासाठी विविध शोभेच्या वस्तू, ईलेक्ट्रॉनिक साहित्य, लायटींग आदींच्या दुकानांमध्येही भाविकांनी गर्दी केल्याने अर्थकारणास चालना मिळाल्याचेही चित्र गत दोन दिवसांपासून दिसून येत आहे.