अकोल्यात पावसाचे आगमन; शेतकऱ्यांना दिलासा; अनेक दिवसांपासून पावसाची होती प्रतिक्षा
By रवी दामोदर | Published: July 6, 2024 05:02 PM2024-07-06T17:02:15+5:302024-07-06T17:03:01+5:30
जिल्ह्यात मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या लांबल्या आहेत. जिल्ह्यात विखुरत्या स्वरूपाचा पाऊस असल्याने काही भागात पेरण्या आटोपल्या असून, पिके शेतात डोलत आहे.
अकोला : मृग नक्षत्रानंतर आर्द्रातही पावसाने हुलकावणी दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जुलै महिन्याला सुरुवात होऊनही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी चिंतीत होता. शनिवार, दि.६ जूलै रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने आगमन केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. अद्यापही काही भागात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यात मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या लांबल्या आहेत. जिल्ह्यात विखुरत्या स्वरूपाचा पाऊस असल्याने काही भागात पेरण्या आटोपल्या असून, पिके शेतात डोलत आहे. गत आठ दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शनिवारी अकोला शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे, तसेच आगामी पाच दिवस पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात पावसाची शक्यता
नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात ११ जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता दर्शविली आहे. पूरस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी नदीमध्ये, नाल्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नये व पूर पाहण्यासाठी नदी-नाला काठावर जाऊ नये. वीज व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.