कला, वाणिज्य शाखेच्या प्रश्नपत्रिका येणार ऑनलाइन
By admin | Published: March 4, 2017 02:21 AM2017-03-04T02:21:50+5:302017-03-04T02:21:50+5:30
अमरावती विद्यापीठ प्रश्नपत्रिका एक तासापूर्वी संकेतस्थळावर टाकणार.
विवेक चांदूरकर
बुलडाणा, दि. ३- विद्यापीठांतर्गत होणार्या कला व वाणिज्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आता परीक्षा केंद्रांवर छापील स्वरूपात न येता परीक्षेच्या एक तास आधी ऑनलाइन टाकण्यात येणार असून, झेरॉक्स काढून परीक्षार्थींना वाटण्यात येणार आहे. गतवर्षी केवळ विज्ञान शाखेच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठविण्यात आल्या, तर आता कला व वाणिज्य शाखेच्या प्रश्नपत्रिकाही ऑनलाइन पाठविण्यात येणार आहेत.
सध्या बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून, विद्यापीठाच्या परीक्षांना पुढील महिन्यापासून प्रारंभ होणार आहे. यावर्षी शासनाने महाविद्यालयीन परीक्षा पद्धतीत बदल करण्याचे ठरविले आहे. सध्या प्रत्येक जिल्हय़ाच्या ठिकाणी प्रश्नपत्रिका पोलीस संरक्षणात ह्यकस्टडी रूमह्णमध्ये ठेवण्यात येतात. त्यानंतर पेपरच्या पहिल्या दिवशी या प्रश्नपत्रिका कस्टडी रूममध्ये आणण्यात येतात. पेपरच्या दिवशी एक तास आधी या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राकडून आलेल्या कर्मचार्याकडे सोपविण्यात येतात. यामध्ये आता बदल करण्यात आला असून, आता विद्यापीठाने तयार केलेल्या संकेतस्थळावर प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्याच्या एक तास आधी ऑनलाइन टाकण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित परीक्षा केंद्रांवरील केंद्रप्रमुखाला या प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढून परीक्षार्थींना वाटण्यात येणार आहे. यामध्ये अधिक गुप्तता पाळण्याकरिता प्रत्येक महाविद्यालय व परीक्षा केंद्राला एक कोड देण्यात येणार आहे. सदर कोड महाविद्यालयाने संकेतस्थळावर टाकल्यानंतर तो स्कॅन करण्यात येईल. सदर कोड जुळल्यानंतरच प्रश्नपत्रिका निदर्शनास पडणार आहे.
संकेतस्थळ बंद पडले, तर प्रश्नपत्रिका ई-मेल किंवा व्हॉट्सअँपवर!
विद्यापीठाच्या वतीने संकेतस्थळावर एक तास आधी प्रश्नपत्रिका टाकण्यात येणार आहे; मात्र जर एखाद्या वेळी संकेतस्थळ बंद असले किंवा प्रश्नपत्रिका निदर्शनास पडली नाही, तर महाविद्यालयाच्या ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे. त्यातही अडचणी आल्या, तर संबंधित परीक्षा केंद्रातील केंद्रप्रमुखाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे.
उत्तरपत्रिका तपासणार ऑनलाइन!
गतवर्षीपासून विज्ञान शाखेच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासण्यात येत आहेत. उत्तरपत्रिका संगणकावर स्कॅन करून टाकण्यात येते. त्यानंतर सदर उत्तरपत्रिका संबंधित प्राध्यापक तपासून गुणही ऑनलाइन टाकतो. आता ही पद्धत सर्वच कला व विज्ञान शाखेच्या पेपर तपासण्याकरिताही अमलात आणण्यात येणार असल्याची माहिती आहे.