ग्रामीण भागातील कलावंतामध्येही सुप्त गुण!
By admin | Published: July 13, 2015 01:19 AM2015-07-13T01:19:09+5:302015-07-13T01:19:09+5:30
अभिनेत्री सुरभी हांडे यांचेशी संवाद
ब्रम्हानंद जाधव/ मेहकर (जि. बुलडाणा): मुलं स्वत:तील गुण लपवून वडीलांनी सांगितलेल्या क्षेत्रातच आपली कारकीर्द घडवतात. यात मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळत नाही. मुलांना ज्या क्षेत्रात आवड आहे ते बनण्याची त्यांना संधी द्यावी. अनेकांना अभिनय क्षेत्रात आवड असते, परंतू, त्यांना कुटूंबीयाकडून तसा प्रतिसाद मिळत नाही. शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील मुलांमध्येही अभिनयाचे सुप्त गुण लपलेले असतात. युवा पिढीला अभिनय क्षेत्रात चांगली संधी असल्याचे मत जय मल्हार मालिकेत म्हाळसाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री सुरभी हांडे यांनी १२ जुलै रोजी व्यक्त केले.
प्रश्न : तुम्ही कला क्षेत्रच का निवडलं ?
आमचे मुळ गाव नागपूर. माझं बालपण नागपूरमध्ये गेलं. त्यानंतर माझ्या बाबांची जळगाव आकाशवाणीमध्ये संगीतकार म्हणून निवड झाली. माझी आई लेखिका आणि गायिका आहे. एम.जे.महाविद्यालयात ती प्राध्यापक असून, संगीत विभागाची प्रमुख आहे. तिला कविता व नाट्यलेखनाची आवड आहे. त्यामुळे आईबाबा दोघेही कला क्षेत्रात असल्यामुळे मलाही कला क्षेत्राची गोडी लागली.
प्रश्न : आईबाबा दोघेही संगीतक्षेत्रात असताना तुम्ही अभिनय क्षेत्रात कशा आल्या?
आईबाबा दोघेही संगीत क्षेत्रात असल्याने मी शाळेत असतांना शास्त्रीय गायन व कथ्थक शिकले. तसेच पाचवी व सहावीत असतांना मी बालनाट्यात सहभाग घेतला. दहावीपर्यंंत अनेक बालनाट्यात अभिनय केला. त्यानंतर एम.जे.महाविद्यालयात बारावीपर्यंंतचं शिक्षण घेत असताना अनेक नाटकामध्ये चांगल्या भूमिका मिळत गेल्याने नकळत अभिनय क्षेत्राकडे मी वळले.
प्रश्न : छोट्या पडद्यावर काम करतांनाची भूमिका कशी वाटते?
पदवीसाठी एम.जे.महाविद्यालयात प्रवेश घेतला असता, विविध स्पर्धांंमध्ये सहभाग घेऊन त्यामध्ये पारितोषिकंही मिळवीली. तीन वर्षांंमध्ये अनेक नाटकांमध्येही काम केलं. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित स्वामी या नाटकात भूमिका साकारली. या नाटकाचे जवळपास ५00 प्रयोग केले. काही दिवसांतच मुंबईत आंबटगोड या मालिकेसाठी ऑडिशन दिली, यात निवडही झाली. अशा छोट्या पडद्यावर काम करीत असताना अथक परिश्रमाची जोड आवश्यक असते. छोट्या पडद्यावर भूमिका निभावतानाच खरी रंगभूमीची जाण मला झाली.
प्रश्न : मोठय़ा पडद्यावर झळकण्याची पहिली वेळ कोणती ?
अकरावीला असताना संजय सूरकर यांनी मला स्टॅण्डबाय या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. यामध्ये सचिन खेडेकर हे वडीलांच्या भूमिकेत होते. तर आदिनाथ कोठारे यांच्या लहान बहिणीची म्हणजे राधाची भूमिका मी साकारली. स्टॅण्डबाय या चित्रपटामुळे थेट मोठय़ा पडद्यावर झळकण्याची माझी पहिली वेळ होती; त्यात मी चांगल यश प्राप्त केलं.
प्रश्न : अभिनय क्षेत्रात काम करतांना मोठे आव्हान केंव्हा समोर आले ?
जय मल्हार या मालिकेत म्हाळसाची भूमिका साकारणे म्हणजे खूप मोठे आव्हान होते. म्हाळसाचं पात्र साकारण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. जय मल्हार या मालिकेचं चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी मी या पात्राविषयी खूप पुस्तके वाचली. म्हाळसा म्हणजे पार्वतीची भूमिका साकारणं हे एक आव्हानच होतं. यासाठी आईबाबांची खंबीर साथ मला मिळाली.