हास्यसम्राट अरविंद भाेंडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 10:35 AM2021-03-01T10:35:24+5:302021-03-01T10:36:18+5:30
Arvind Bhande passes away हास्यसम्राट फेम अरविंद भाेंडे (वय ५७ वर्षे) यांचे २८ फेब्रुवारी राेजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास निधन झाले.
अकोला : ‘कार्यक्रम असा की पाेटभर हसा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांना हसविणारे, हास्यसम्राट फेम अरविंद भाेंडे (वय ५७ वर्षे) यांचे २८ फेब्रुवारी राेजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास निधन झाले. अकाेल्याच्या साहित्य क्षेत्राला समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे साहित्य क्षेत्राची फारमाेठी हानी झाल्याची प्रतिक्रिया साहित्य वर्तुळात व्यक्त हाेत आहे.
हास्यातून दैनंदिन जीवनातील ताणतणाव क्षणात दूर करणारे अरविंद भाेंडे यांना साहित्य क्षेत्रातील मानाचा गदिमा पुरस्कार प्राप्त झाला हाेता. त्यांची ‘काेण म्हणते भारत देश महान नाही’ ही कविता गाजली हाेती. पाटबंधारे विभागात नाेकरी सांभाळून त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रमांना हजेरी लावली. लाखाे रसिकांना त्यांनी हास्याची मेजवाणी दिली. मात्र, सर्वांना हसविणारा कलावंत जग साेडून गेला आहे. साहित्यिक हिम्मत शेगाेकार यांच्या निधनानंतर अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत, त्यांनी पुन्हा अंकुर साहित्य संघाला नवसंजीवनी प्राप्त करून दिली हाेती. दरम्यान, त्यांनी चार राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलने यशस्वी केली. गत १४ दिवसांपासून ते कोरोनामुळे शहरातील खासगी दवाखान्यात उपचार घेत होते. त्यांच्यापश्चात त्यांच्या पत्नी, एक विवाहित मुलगी, मुलगा-सून आणि मोठा आप्तपरिवार आहे.
खडकी येथील कार्यक्रम ठरला शेवटचा
काेराेनाच्या काळात त्यांचा हास्यसंवादही लाॅकडाऊन झाला हाेता. मात्र, अनलाॅकच्या प्रक्रियेत त्यांचे कार्यक्रम पुन्हा सुरू झाले हाेते. दरम्यान, एका महिन्यापूर्वी अकाेला शहरातीलच जिल्हा परिषद काॅलनी, खडकी येथे त्यांचा कार्यक्रम झाला हाेता. ताे त्यांचा शेवटचा कार्यक्रम झाला.
फेसबुक पाेस्टद्वारे मानले पत्नी व रसिकांचे आभार
हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असताना, फेसबुक, व्हाॅट्सॲपद्वारे ते रसिकांशी संवाद साधत हाेते. दरम्यान, २३ फेब्रुवारी राेजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने, त्यांनी फेसबुक पाेस्टद्वारे पत्नी दुर्गा यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील लाेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी रसिकांचे आभार मानून त्यांचा अभिमान असल्याचे पाेस्टमध्ये म्हटले.