पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात फिरकलेच नाहीत; अरविंद सावंत यांची उपमुख्यमंत्र्यांवर टीका
By आशीष गावंडे | Published: April 11, 2023 06:38 PM2023-04-11T18:38:25+5:302023-04-11T18:38:47+5:30
पालकमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्ह्यात फिरकलेच नाहीत अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.
अकोला: जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. बाळापुर तालुक्यातील पारस येथे मंदिरात आरती करणाऱ्या भाविकांच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार तथा विदर्भाचे संपर्कप्रमुख, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी केली.
जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघात पारस येथे मंदिरामध्ये आरती सुरू असताना मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे भाविकांच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे सात भाविकांचा मृत्यू झाला. यापैकी अनेक जण जखमी झाले. मंगळवारी सकाळी शिवसेनेचे खासदार तथा विदर्भाचे संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृती बद्दल विचारणा केली. यावेळी उपस्थित पत्रकारांसोबत संवाद साधला असता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली.
अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. पारस येथील दुर्दैवी घटना घडल्यानंतरही राज्यकर्त्यांनी केवळ भ्रमणध्वनीद्वारे शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे अरविंद सावंत यावेळी म्हणाले. त्यांच्यासोबत जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रकाश शिरवाडकर, शहर प्रमुख (अकोला पश्चिम) राजेश मिश्रा, शहर प्रमुख (अकोला पूर्व) राहुल कराळे, अतुल पवनीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फडणवीस अमरावतीमध्ये आले, मग अकोल्यात का नाही?
शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अमरावती येथे पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सोमवारी उपस्थिती लावली. फडणवीस यांच्याकडे अकोल्याचे पालकत्व असताना ते अकोल्यात का आले नाहीत, असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.