शहराची स्वच्छता होत नसल्याने, महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी! कचऱ्याचे ढीग दिसले तर थेट निलंबन
By नितिन गव्हाळे | Published: July 2, 2024 11:41 PM2024-07-02T23:41:07+5:302024-07-02T23:41:25+5:30
शहरात स्वच्छता झाली नाही, ढीग आढळून आल्यास स्वच्छता निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचा दम भरत त्यांनी, अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
अकोला: गत काही दिवसांपासून शहरात कचऱ्याचे ठिकठिकाणी ढीग दिसत असून, शहराची स्वच्छता कागदावर होत असल्याने, २ जुलै रोजी दुपारी महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी स्वच्छता विभागासह इतरही विभागांची बैठक घेत, स्वच्छतेच्या कामामध्ये कामचुकारपणा किंवा खोटेपणा खपून घेतला
जाणार नाही. शहरात स्वच्छता झाली नाही, ढीग आढळून आल्यास स्वच्छता निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचा दम भरत त्यांनी, अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनिल लहाने यांनी मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागांची पाहणी केली असताना, शहरात मुख्य रस्त्यांच्या कडेला आणि प्रभागातील आतमधल्या खुल्या भुखंडामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग उचलल्याच गेले नसल्याचे उघड झाले. तसेच दैनंदिन होणारे स्वच्छतेच्या कामात दिरंगाई केली जात असून, नाले सफाईचे कामानंतर नाल्यामधून निघालेला गाळ व कचरा नाल्यांच्या कडेला दिसत आहे. याचसोबत शहरात सिंगल युज प्लास्टिकचा सर्रास पणे वापर सुरू असल्याचे मनपा आयुक्त डॉ. लहाने यांनी अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणुन देत, स्वच्छता विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आणि खरमरीत शब्दात अधिकाऱ्यांची खरडपट्टीत काढत, यापुढे रस्त्यांवर कचरा, ढीग दिसले तर थेट निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा
शहरामधील कचरा टाकण्यात आलेले सर्व ठिकाणे, दोन आठवड्यांत स्वच्छ करा आणि ज्या भागात कचरा आढळून आलेला आहे. त्या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना घरात व प्रतिष्ठानात निघणारा कचरा डस्टबीनमध्ये गोळा करून मनपाच्या कचरा घंटा गाडीमध्येच टाकणेसाठी प्रवृत्त करा. त्यानंतरही नागरिक परिसरात, रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.
मलेरिया विभागाकडून फवारणी करून घ्या
शहरात नाले सफाईचे काम थातुरमातूर झाल्याचे निदर्शनास आले असून, नाल्यांतील तुंबलेल्या सांडपाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे सर्व स्वच्छता निरीक्षकांनी सर्व नाल्यांची स्वच्छता करावी. सफाई नंतर निघालेला गाळ व कचरा तातडीने उचलावा. तसेच खुल्या भुखंडामध्ये, परिसरात पाण्याचे डबके आढळ्यास मलेरिया विभागाकडून डांसअळी फवारणी करून घ्यावी. असेही निर्देश आयुक्त डॉ. लहाने यांनी दिले. बैठकीला मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्यासह अधिकारी, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.