मतदान केंद्रांवर गरोदर मातांच्या मदतीसाठी ‘आशा ’स्वयंसेविका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:41 PM2019-04-13T13:41:34+5:302019-04-13T13:42:14+5:30
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर गरोदर मातांच्या मदतीसाठी आशा स्वयंसेविका राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर गरोदर मातांच्या मदतीसाठी आशा स्वयंसेविका राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर ‘रॅम्प’ आणि व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून, गरोदर महिला मतदारांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर आशा स्वयंसेविकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर मतदान पथकांसोबत आशा स्वयंसेविका थांबणार असून, गरोदर महिला मतदारांना मदत करणार आहेत. मतदान केंद्रांवर रुग्णवाहिकादेखील तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. यावेळी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, जनसंपर्क अधिकारी शाहू भगत व प्रकाश गवळी उपस्थित होते.
जिल्ह्यात ७०८० गरोदर महिला!
जिल्ह्यात ७ हजार ८० गरोदर महिला असून, त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव यांनी दिली.
जिल्हा परिषदेत परिसर स्वच्छता उपक्रम!
जिल्हा परिषदेत चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद परिसर स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितले.