आशिया खंडातील पाणपक्ष्यांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2016 01:51 AM2016-01-11T01:51:25+5:302016-01-11T01:51:25+5:30
‘एशियन बर्ड काऊंट’; बीएनएचएससह विविध संस्थांचा उपक्रम.
विवेक चांदूरकर/वाशिम : प्रदूषण व वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आशिया खंडात 'एशियन बर्ड काऊंट' हा कार्यक्रम राबविण्यात येत असून, या अंतर्गत पाणपक्ष्यांची गणना करण्यात येत आहे. ९ ते २४ जानेवारीदरम्यान हे सर्वेक्षण चालणार असून, यामध्ये निदर्शनास पडणार्या पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात येणार आहे. तसेच जैवविविधतेबाबतही माहिती गोळा करण्यात येणार आहे. आशिया खंडात कोणत्या पक्ष्यांची संख्या किती प्रमाणात आहे, याचा ताळेबंद घेण्यासाठी ह्यएशियन बर्ड काऊंटह्ण हा उपक्रम वॉटरफॉल सेन्सस या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यामध्ये वेगवेगळ्या देशातील विविध स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. भारतात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहे. ९ ते २४ जानेवारीदरम्यान संपूर्ण देशातील विविध पाणवठय़ांवर येणार्या पाणपक्ष्यांची यादरम्यान पाहणी करण्यात येणार असून, त्यांच्या नोंदी घेण्यात येणार आहे. याकरिता राज्यानुसार किंवा विभागानुसार बीएनएचएस विविध संस्थांची मदत घेत आहे. या संस्थांच्या माध्यमातून पक्षीमित्र संपूर्ण देशातील पाणवठय़ांवर पक्षीनिरीक्षण करीत आहे. याकरिता विविध विभागाला काही दिवस ठरवून देण्यात आले आहे. पाणवठय़ांवर कोणते पक्षी आहेत, त्यापैकी कोणते स्थलांतरित आहेत, कोणते स्थानिक आहेत, त्यांची संख्या किती आहे, गतवर्षी त्यांची संख्या किती होती, त्यांच्या हालचाली कशा होत्या, या सर्व बाबींची नोंद घेणार आहेत. या नोंदींचा संपूर्ण डाटा बीएनएचएसकडे पाठविण्यात येणार आहे. बीएनएचएस हा डाटा आशियातील संस्थेकडे पाठविण्यात येणार आहे. पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत असल्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. तसेच पक्ष्यांच्या जीवनपद्धतीत अनेक बदल होत आहे. काही पक्ष्यांची संख्या वाढत आहे, तर काहींची घटत आहे. या संपूर्ण बाबी या सर्वेक्षणात टिपण्यात येणार आहे.