वाडेगावचा माजी सरपंच आसिफ खान पोलिसांच्या जाळय़ात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 02:01 AM2017-09-29T02:01:10+5:302017-09-29T02:01:36+5:30
अकोला : सार्वजनिक वितरण प्रणालीचा २0 टन गहू काळाबाजारात नेत असताना मेहकर पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी जप्त केल्यानंतर, या प्रकरणात चालकासह तिघांना अटक केली होती. या तिघांच्या चौकशीवरून पोलिसांनी वाडेगावचा माजी सरपंच आसिफ खान याला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. यावरून सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य विकणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे. आसिफ खानकडे बाळापूर-पातूर तालुक्यातील शालेय पोषण आहाराच्या वाहतुकीचे कंत्राट असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

१४ सप्टेंबर रोजी ४.३0 वाजताच्या सुमारास लव्हाळा फाटा येथे पोलीस, पुरवठा निरीक्षक व तहसीलदार यांनी नाकाबंदी करून एस.एच. ३७ जे ४६६३ क्रमांकाच्या ट्रकला अडवले असता, त्यात काळाबाजारात विक्रीसाठी नेत असलेला २५ लाख ६१ हजार ८२0 रुपयांचा २0 टन गहू दिसून आला. पोलिसांनी तो जप्त केला व आरोपी लक्ष्मण ऊर्फ प्रकाश सखाराम कुडके, अल्ताफ अजीज कच्छी दोघेही राहणार चिखली, वाजिद मिर्झा युसूफ मिर्झा व मो. फारूख मो. इब्राहीम दोघेही राहणार वाशिम यांना अटक केली व त्यांच्याविरुद्ध कलम ३, ७ जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपी मेहकर पोलिसांच्या कोठडीत असून, त्यांची सखोल चौकशी केली असता, सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य राज्याबाहेर विकणारे एक रॅकेट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी बाळापूर व पातूर तालुक्याचा शालेय पोषण आहाराचा कंत्राट असलेला तसेच वाडेगावचा माजी सरपंच आसिफ खान याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापयर्ंत मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आसिफ खान यांची चौकशी करण्यात आली. आसिफ खान यांच्यावर अशाच प्रकारचे आरोप असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याची माहिती उपविभागीय कार्यालयातील पोलिसांनी दिली.
कॉल डाटावरून आरोपींचा शोध
मेहकर पोलिसांनी या प्रकरणातील काही आरोपीचा कॉल डाटा काढला आहे. अटकेत असलेल्या आरोपींचा संपर्क कुणा-कुणासोबत आहे, ते कुठून धान्य आणतात, यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये कोण आरोपी आहेत, अशा सर्वांची चौकशी पोलीस करीत आहेत. त्यानुसार अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हय़ातील रेशन माफियांचा पोलीस शोध घेत आहेत.
वाशिममधील मन्नान खानही ताब्यात
वाशिम येथील मन्नान खान नामक रेशन माफियासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन बड्या रेशन माफियांनी मोठा गोंधळ घातला असून, चिमुकल्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. वाडेगावचा माजी सरपंच आसिफ खान याला मेहकर पोलिसांनी अटक केल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी वाशिम येथील बडा रेशन माफिया मन्नान खान याला अटक केली असून, यामध्ये आणखी रेशन माफियांवर कारवाईचा फास आवळल्या जाणार आहे.