आसीफ खान हत्याकांडातील दोघांचा जामीन अर्ज फेटाळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:09 PM2019-01-16T13:09:51+5:302019-01-16T13:09:56+5:30
अकोला : वाडेगावचे माजी सरपंच आसीफ खान मुस्तफा खान हत्याकांड प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी झाली असून, त्यांच्या न्यायालयाने दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला असून, एका आरोपीस जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अकोला : वाडेगावचे माजी सरपंच आसीफ खान मुस्तफा खान हत्याकांड प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी झाली असून, त्यांच्या न्यायालयाने दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला असून, एका आरोपीस जामीन मंजूर करण्यात आला आहे.
वाशिम जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष ज्योती गणेशपुरे हिने आसीफ खान यांची हत्या घडवून आणण्याचा कट काजळेश्वर येथे १५ आॅगस्ट रोजी सकाळी रचल्यानंतर १६ आॅगस्ट रोजी ज्योती गणेशपुरेने आसीफ खान यांना मूर्तिजापूर येथे बोलावले व त्यानंतर त्यांना सोबत घेऊन दर्यापूर तालुक्यातील आमला या ठिकाणी बहीण संगीता वानखडे हिच्या घरी नेले होते. या ठिकाणावर काजळेश्वर येथील रहिवासी रामदास पखाले, अशोक साबणकर, मोहम्मद वारीस शेख हुसेन, स्वप्निल वानखडे, वैभव गणेशपुरे व ज्योती गणेशपुरे यांनी आसीफ खान यांची हत्या केली होती. त्यावेळी झालेल्या झटापटीत ज्योती गणेशपुरेला चाकू लागल्याने ती जखमी झाली होती. आसीफ खान यांचा मृत्यू झाल्यानंतर सदर आरोपींनी त्यांचा मृतदेह कारमध्ये टाकला व म्हैसांगच्या पुलावरून कार नदीत लोटण्याचा प्रयत्न केला; मात्र कार झाडात अडकल्याने त्यांचा कट अयशस्वी होत असल्याचे दिसताच त्यांनी आसीफ खानचा मृतदेह नदीत फेकला होता. आसीफ खान बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मुलगा सोहेल खान यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मूर्तिजापूर पोलिसांकडे या गुन्ह्याचा तपास दिल्यानंतर त्यांनी तपास करून आरोपींना अटक केली. सदर आरोपी कारागृहात असून, त्यांनी दोषारोपपत्र दाखल होताच जामिनासाठी धावपळ सुरू केली आहे. यामधील स्वप्निल वानखडे, अशोक साबणकर व मोहम्मद वारीस शेख हुसेन या तीन आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असून, साबणकर व वानखडे या दोघांचा जामीन अर्ज फेटाळला असून, मो. वारीस शेख हुसेन यास जामीन मंजूर करण्यात आला आहे.