समविचारी पक्षाच्या आकांक्षा, महत्त्वाकांक्षा जास्त - कृपाशंकरसिंह मिश्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 14:34 IST2019-02-25T14:33:14+5:302019-02-25T14:34:01+5:30
अकोला: लोकसभा-विधानसभा निवडणुकांसंदर्भात समविचारी पक्षांसोबत बोलणी सुरू आहे. समविचारी पक्षाच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा जास्त आहेत, हे दुर्भाग्य आहे. जर समविचारी पक्ष ऐकत नसेल, तर काँग्रेस अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करेल. काँग्रेसकडे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले अनेक उमेदवार आहेत, असे मत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकरसिंह मिश्रा यांनी व्यक्त केले.

समविचारी पक्षाच्या आकांक्षा, महत्त्वाकांक्षा जास्त - कृपाशंकरसिंह मिश्रा
अकोला: लोकसभा-विधानसभा निवडणुकांसंदर्भात समविचारी पक्षांसोबत बोलणी सुरू आहे. समविचारी पक्षाच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा जास्त आहेत, हे दुर्भाग्य आहे. जर समविचारी पक्ष ऐकत नसेल, तर काँग्रेस अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करेल. काँग्रेसकडे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले अनेक उमेदवार आहेत, असे मत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकरसिंह मिश्रा यांनी व्यक्त केले. एका सामाजिक कार्यासाठी रविवारी ते अकोल्यात आले असताना ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.
समविचारी पक्ष नेत्यांशी वारंवार बोलून झाले आहे; मात्र त्यांच्या अवाजवी मागण्यांमुळे बोलणी थांबली आहे. त्यावर अद्याप पर्याय निघालेला नाही; मात्र जर बोलणीतून काही तथ्य निघतच नसेल, तर पुढे काय, म्हणून काँग्रेसने तयारी केलेली आहे. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची कोणतीही रणनीती नाही. राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेसाठी काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुकांपेक्षाही जास्त जागा यंदा काँग्रेसला मिळणार आहेत. त्यातही महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असेही ते बोलले. सध्या देशाला आणि काँग्रेसला प्रियंका गांधींची आवश्यकता आहे. प्रियंका गांधींना कुणाची आवश्यकता नाही. राहुल गांधी यांना कुणी पंतप्रधान होण्यापासून रोखू शकत नाही, असेही ते बोलले. भाजप किंवा मोदींवर मात्र त्यांनी एका शब्दाने टीका केली नाही. काँग्रेस पुन्हा नव्या दमाने सत्तेत येईल, असा विश्वासही मिश्रा यांनी व्यक्त केला.