दहावीच्या निकालाच्या दृष्टीकोनातून ३४४ शाळांचे मूल्यांकन पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:14 AM2021-07-15T04:14:38+5:302021-07-15T04:14:38+5:30
मूल्यमापनासाठी शिक्षण मंडळाने एक परिपत्रक तयार करून ते सर्व शाळांना पाठविले होते. मात्र, अनेक शाळांनी या परिपत्रकाचे नीट वाचन ...
मूल्यमापनासाठी शिक्षण मंडळाने एक परिपत्रक तयार करून ते सर्व शाळांना पाठविले होते. मात्र, अनेक शाळांनी या परिपत्रकाचे नीट वाचन केले नाही. त्यातील मुद्दे समजून घेतले नाहीत. अशी ओरड होत होती. परंतु अकोला जिल्ह्यातील जवळपास १०० टक्के शाळांनी मूल्यमापनाचा टप्पा पूर्ण केला आहे. परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे शाळांना दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून ४ जुलैपर्यंत त्याचा अहवाल शिक्षण मंडळाकडे सादर करण्यात सुद्धा आला आहे. शिक्षण मंडळाचे मार्गदर्शन आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून जिल्ह्यातील दहावीच्या ३४४ शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकनाचे काम पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, त्यातही एकही त्रुटी आढळून आली नाही.
सर्वच शाळांचे मूल्यांकन पूर्ण!
जिल्ह्यात दहावीच्या एकूण ३४४ शाळा आहेत. त्यापैकी सर्वच शाळांनी मूल्यांकन पूर्ण करीत निकाल तयार करून तो बोर्डाकडे सादर केला. त्यामुळे मूल्यांकनाविना एकही शाळा जिल्ह्यात नाही.
मूल्यांकनातील चुका कोणी सुधारायच्या?
दहावीचा निकाल तयार करताना ८० गुणांच्या आधारावर तो तयार करायचा होता. पण काहींनी तो १०० गुणांच्या आधारावर तयार केला.
निकाल कसा तयार करायचा याच्या परिपत्रकाचे काही शाळेच्या शिक्षकांनी परिपूर्ण वाचन केले नाही, त्यामुळे त्यात त्रुटी आल्या. शिक्षण विभागाने निकाल कसा तयार करायचा यासाठी ऑनलाईन कार्यशाळा घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या.
शिक्षण मंडळाने दिलेल्या सूचना, परिपत्रकानुसार आणि माध्यमिक शिक्षण मंडळाने लक्ष घालून शाळांचे मूल्यांकन करण्यावर भर दिला. त्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत. याकडे लक्ष दिले. त्यामुळेच जिल्ह्यातील दहावीच्या ३४४ शाळांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे.
-दिलीप तायडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक
कोरोनामुळे शाळा बंद होती. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. त्यामुळे शाळेने अंंतर्गत चाचणी, नववीतील गुण, दहावीतील चाचणींचे गुण व मूल्यमापन करून बोर्डाकडे निकाल दिला. १९३ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आम्ही बोर्डाकडे पाठविले. त्यात काही त्रुटी आढळून आल्या नाहीत.
-अरूण राऊत, मुख्याध्यापक जागृती विद्यालय
शिक्षण मंडळाने दिलेल्या परिपत्रकानुसार आम्ही विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले. काही अडचणी आल्या. त्रुटी आढळल्या. परंतु शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शनानुसार त्रुटी दूर केल्या. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून बोर्डाकडे दिले आहे. आता निकालाची प्रतीक्षा आहे.
-शत्रुघ्न बिरकड, मुख्याध्यापक जय बजरंग विद्यालय आळंदा
जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी
२६९७७
जिल्ह्यातील शाळा
३४४
मूल्यांकन झाले- ३४४
मूल्यांकन बाकी- ००