मालमत्तांचे व्यवहार निम्यावर!

By admin | Published: November 16, 2016 02:02 AM2016-11-16T02:02:40+5:302016-11-16T02:02:40+5:30

बुधवार-गुरुवारी व्यवहारच झाला नाही; नोटा रद्दचा परिणाम.

Assets deal! | मालमत्तांचे व्यवहार निम्यावर!

मालमत्तांचे व्यवहार निम्यावर!

Next

अकोला : चलनातून एक हजार आणि पाचशे रुपयांची नोट बाद होण्याच्या दोन दिवसाआधी व ९ नोव्हेंबरनंतर कार्यालयीन कामकाजाच्या दोन दिवसांत दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये व्यवहार नोंदणीमध्ये पन्नास टक्के तफावत आली आहे. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कामध्येही मोठा फटका शासनाला बसला आहे. त्यातच बाजारभाव आणि शासकीय किमतीमध्ये प्रचंड तफावतीचे व्यवहार करणार्‍यांची पाचावर धारण बसली आहे.
एक हजार आणि पाचशे रुपयांची नोट व्यवहारातून बाद ठरविण्यात आली. त्या नोटा कोणाहीकडे असल्यास त्या बँकेत जमा कराव्या लागत आहेत. त्या नोटा जमा करण्यासाठी दोन लाख पन्नास ही नादेय कराची र्मयादा पाहता, त्यापेक्षा अधिक रकमेचा हिशेब आयकर विभागाला द्यावा लागणार आहे. त्यामुळे एखाद्या मालमत्तेची विक्री करताना मुद्रांक शुल्क जेवढय़ा रकमेचे लागले. तेवढीच रक्कम अधिकृत स्रोताची समजली जाणार आहे. त्या मालमत्तेची बाजारभावाने मिळालेल्या अतिरिक्त रकमेचा हिशेब कसा द्यावा, ही विवंचना सर्वांना आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोणतीही मालमत्ता विकणे किंवा खरेदी करण्यापासून नागरिक दूरच राहत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी, मुद्रांक शुल्क विभागात सध्या शांतता आहे. गेल्या मंगळवारी निर्णय होण्याच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालयांना दस्त नोंदणीसाठी ३१ लाख १२ हजार मुद्रांक शुल्क मिळाले, तर नोंदणी शुल्काचे ६ लाख १५ हजार ४७0 रुपये मिळाले.

 जिल्हाभरात बसला फटका!
नोटा बदलाच्या मंगळवारी रात्रीच्या निर्णयानंतर बुधवार व गुरुवार या दोन्ही दिवशी व्यवहारच झाला नसल्याचे समोर आले आहे. बाळापूर तालुक्याचा आढावा घेतला तर ९ व १0 नोव्हेंबर रोजी एकही खरेदी विक्री झाली नाही. त्याआधी ७ व ८ नोव्हेंबर रोजी येथे ८७ लाख ६ हजारांचे व्यवहार झाले होते. ११ नोव्हेंबर रोजी सहा खरेदी झाल्या असून, त्याची किंमत २८ लाख एवढी आहे. येथे तीन बक्षीसपत्रेही झालीत. पातूर तालुक्यातही असेच चित्र आहे. ७ व ८ नोव्हेंबर रोजी सात खरेदी झालेल्या या तालुक्यात ९ नोव्हेंबरपासून खरेदी-विक्रीचे व्यवहार मंदावले आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातसुद्धा बुधवार व गुरुवारी खरेदी झालेली नाही. शुक्रवारी केवळ तीन खरेदी झाल्यात. येथे सरासरी आठ खरेदी होतात. मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये अकोट तालुक्यात घट असल्याचे दिसत आहे. येथे खरेदीचे सरासरी १५ व्यवहार दैनंदिन होतात. येथे नोटासंदर्भातील निर्णय जाहीर झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी १४ मालमत्तांच्या खरेदी झाल्यात. गुरुवार, शुक्रवारी प्रत्येकी सात मालमत्तांचेही खरेदी व्यवहार झाल्याची नोंद आहे.

    काही महिन्यांपूर्वी थोडीथोडकी रक्कम देऊन 'इसारचिठ्ठी' करणार्‍या अनेकांच्या खरेदीचा व्यवहार नोव्हेंबर २0१६ महिन्यात होऊ घातला होता; मात्र बुधवारपासून ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा चलनातून गायब झाल्याने रोखीचा व्यवहार जवळपास अशक्य ठरला आहे. रद्द झालेल्या या नोटा स्वीकारायला कुणी तयार नाही आणि मोठय़ा रकमेचा 'विड्रॉल' द्यायला बँका तयार नाहीत, अशा द्विधा संकटात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार अडकले आहेत. या निर्णयामुळे दैनंदिन खरेदीचे व्यवहार हे सरासरी तीनवर येऊन ठेपले आहेत. मालमत्ता विक्री करणार्‍यांच्या तुलनेत खरेदी करणार्‍यांचे प्रमाण घटले आहे.

Web Title: Assets deal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.