घराला लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीची पोहोचवली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:23 AM2021-08-14T04:23:33+5:302021-08-14T04:23:33+5:30
आगीत चार वर्षांची मुलगी प्रिया गोपाल सरकटे व २६ वर्षीय रतन भारत सरकटे, असे दोन जण किरकोळ जखमी झाले ...
आगीत चार वर्षांची मुलगी प्रिया गोपाल सरकटे व २६ वर्षीय रतन भारत सरकटे, असे दोन जण किरकोळ जखमी झाले होते. तसेच घरातील अन्नधान्य व इतर साहित्य जळून खाक झाले. भारत सरकटे यांच्या घराला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळविले. गावकऱ्यांच्या पुढाकारामुळे मोठा अनर्थ टळला. घराला आग लागली, त्या वेळी घरात दोन लहान मुलांसह एकूण सहा जण होते, परंतु गावकऱ्यांनी आधी त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढून आगीवर नियंत्रण मिळविले होते.
घटनेचा तलाठी मो. तौफिक यांनी पंचनामा करून पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांच्याकडे अहवाल सादर केला होता. अहवालानुसार तहसीलदार दीपक बाजड यांच्या मार्गदर्शनात आगीमध्ये झालेल्या नुकसानीची तत्काळ पाच हजार रुपयांची मदत गुरुवारी १२ ऑगस्ट रोजी चान्नी मंडळाचे मंडळ अधिकारी सतीश श्रीकृष्णा ढोरे, पांगरताटी येथील तलाठी मो. तौफिक यांनी भारत सरकटे यांच्या घरी जाऊन दिली आहे. त्यामुळे भारत सरकटे यांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.