सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस ठाण्यांची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:38 PM2019-06-29T13:38:56+5:302019-06-29T13:39:00+5:30
अकोला: अमरावती परिक्षेत्राच्या विविध जिल्ह्यातून अकोला पोलीस दलात दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना ठाणेदार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अकोला: अमरावती परिक्षेत्राच्या विविध जिल्ह्यातून अकोला पोलीस दलात दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना ठाणेदार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी ही यादी शुक्रवारी काढली असून, त्यांना तातडीने रुजू होण्याचा आदेश देण्यात आला आहे.
अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी काही दिवसांपूर्वी अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. गुरुवारी काढलेल्या आदेशान्वये जिल्ह्यातील पाच सहायक पोलीस निरीक्षकांना विविध पोलीस ठाण्यात रुजू होण्याचा आदेश दिला आहे. तर दोन पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. अकोला पोलीस दलात कार्यरत झालेले शैलेश लहुजी ठाकरे यांच्याकडे सायबर पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक महादेव नामदेव पडघन यांच्याकडे बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया वाडेगाव दूरक्षेत्र प्रभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे. नियंत्रण कक्षात दाखल झालेले धीरज दत्तात्रय चव्हाण यांना अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली आहे. बुलडाणा येथून केंद्र नियंत्रण कक्षात दाखल झालेले आशीष मधुकर लव्हंगळे यांची हिवरखेड पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी बदली करण्यात आली आहे. तर वाशिम येथून आलेले रहीम शेख गफार यांची मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार बदली करण्यात आली आहे.
प्रमोद काळे यांना पदोन्नती
जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेले तसेच अभ्यासू पोलीस निरीक्षक म्हणून ओळख असलेल्या प्रमोद काळे यांना पोलीस उपअधीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी त्यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक पदाची जबाबदारी दिली आहे. काळे यांचा सेवाकाळ कमीच राहिला असल्याने त्यांची जिल्ह्याबाहेरही बदली करण्यात आली नाही.
दोन उपनिरीक्षकांच्या बदल्या
शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकामध्ये चांगली कामगिरी करणारे पोलीस उपनिरीक्षक तुषार नेवारे यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कामकाजामुळे त्यांना या ठिकाणी बदली देण्यात आली, तर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातील अनुराधा पाटेखेडे यांची आकोट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे.