नागीनची पिल्ले आणि अंड्यांनी थांबवले रेल्वेचे काम; अकोला रेल्वेस्थानकावरील घटना
By Atul.jaiswal | Published: September 7, 2022 07:13 PM2022-09-07T19:13:06+5:302022-09-07T19:14:05+5:30
अकोला रेल्वेस्थानकावर नागीनची पिल्ले आणि अंडी आढळल्याने काम थांबवण्यात आले.
अकोला : दक्षिण-मध्य रेल्वेच्याअकोलारेल्वे स्थानकावरील यार्ड परिसरात बुधवारी (६ सप्टेंबर) जुन्या रेल्वेलाईनचे काम सुरु असताना खड्ड्यात नागीनची अंडी व पिल्ले आढळून आल्याने मजुरांनी काम थांबविले. मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नागीनची पिल्ले व अंडी ताब्यात घेतल्यानंतर काम पुन्हा सुरु करण्यात आले. रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक सहा जवळ जुनी रेल्वे लाईन खोदून त्या ठिकाणी नवे रुळ टाकण्याचे काम सुरु आहे. बुधवारी सकाळी हे काम सुरु असताना मजुरांना रुळाखाली एका खड्ड्यात सापाची अंडी व त्यापैकी काही अंड्यांमधून सापाची पिल्ले बाहेर आल्याचे दिसले.
दरम्यान, अंडी सापडलेल्या ठिकाणी साप असण्याच्या आशंकेमुळे मजुरांनी काम थांबवले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पर्यवेक्षक प्रकाश यादव व कर्तव्यावर असलेल्या अभियंत्याने सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना पाचारण केले. बाळ काळणे यांनी अंड्यातून निघालेल्या पिल्लांचे निरीक्षण केले असता, ती पिल्ले नाग जातीच्या सर्पाची असल्याचे स्पष्ट झाले.
सर्पमित्राने घटनास्थळी घेतली धाव
सर्पांमध्ये नाग व अजगर जातीची मादी स्वत:च्या अंड्यांजवळ अनेक दिवस वास्तव्यास असते, असा अनुभव आहे. त्यामुळे अंडी आढळलेल्या ठिकाणी नागीन असण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे बाळ काळणे यांनी सावधगिरी बाळगत अस्तव्यस्त झालेली अंडी गोळा करून एका डब्यात ठेवली. जवळपास १० अंडी सुरक्षित असून, काही अंड्यांमधून पिल्ले बाहेर निघाली होती. ही सर्व अंडी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. रेल्वे रुळाखालची अंडी काढण्यात आल्यानंतर रेल्वेचे काम पुन्हा सुरु झाले.