पावसाळा तोंडावर; खड्डे बाकी, वृक्ष लागवड होणार कशी?
By संतोष येलकर | Published: May 14, 2024 08:59 PM2024-05-14T20:59:15+5:302024-05-14T21:00:07+5:30
आचारसंहितेत अडकले नियोजन : तांत्रिक, प्रशासकीय मान्यताही रखडल्या
अकोला: पावसाळा तोंडावर आला असला तरी, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) जिल्ह्यातील यंदाच्या वृक्ष लागवडीचे नियोजन अडकले आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता रखडल्याच्या स्थितीत वृक्ष लागवडीसाठी खड्डे करण्याची कामे सुरू होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे वृक्ष लागवड सुरू होणार तरी कशी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात ‘नरेगा’ अंतर्गत वृक्ष लागवड केली जाते. त्यापूर्वी ग्रामपंचायती आणि यंत्रणास्तरावरील वृक्ष लागवडीचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत केले जाते, परंतु यंदा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने, जिल्ह्यातील वृक्ष लागवडीच्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे. पावसाळा सुरू होण्यास १८ दिवसांचा कालावधी उरला असतानाही वृक्ष लागवडीसाठी खड्डे करण्याची कामे अद्याप सुरू हाेऊ शकली नाहीत. त्यानुषंगाने जिल्ह्यात वृक्ष लागवड सुरू होणार तरी कधी, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
१३,७०३ कामे प्रस्तावित!
‘नरेगा’ अंतर्गत यंदाच्या जिल्ह्यातील कामांच्या आराखड्यात ग्रामपंचायतींच्या स्तरावर ९ हजार आणि विविध शासकीय यंत्रणांच्या स्तरावर ४ हजार ७०३ अशी एकूण १३ हजार ७०३ वृक्ष लागवडीची कामे प्रस्तावित असून, या कामांची अंदाजपत्रकीय किंमत ३०६ कोटी ९१ लाख रुपये आहे. वृक्ष लागवडीच्या एका कामात एक हजार ते १ हजार ६०० रोपांची लागवड केली जाते, अशी जिल्हा परिषद ‘नरेगा ’ कक्षाच्या सूत्रांनी दिली.
ग्रामपंचायतींचे ठरावही रेंगाळले !
वृक्ष लागवडीच्या कामांसाठी ग्रामपंचायतींनी ठराव घेणे आवश्यक आहे; मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून यासंदर्भात ठराव घेण्याची प्रक्रिया देखील रेंगाळली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्यातील वृक्ष लागवडीच्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
एच.जे.परिहार
गटविकास अधिकारी (नरेगा) , जिल्हा परिषद.