सहकारी सोसायट्यांसाठी ‘अटल महापणन ’अभियान!
By admin | Published: March 3, 2017 01:48 AM2017-03-03T01:48:33+5:302017-03-03T01:48:33+5:30
विशेष कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणासाठी सहकार व पणन विभागामार्फत जिल्ह्यात ‘अटल महापणन विकास’अभियान राबविण्यात येत आहे.
अकोला, दि.२ : विशेष कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणासाठी सहकार व पणन विभागामार्फत जिल्ह्यात ‘अटल महापणन विकास’अभियान राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत अकोला व वाशिम जिल्ह्यातील सहकारी सोसायट्या व खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा शुक्रवारी अकोल्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजित आयोजित करण्यात आली आहे.
प्रत्येक गावातील शेतकरी विशेष कार्यकारी सहकारी सोसायटीचे सभासद करणे, या संस्थांनी नियमाप्रमाणे स्थावर-जंगम मालमत्तांचा व्यावसायिक विकास करणे, क्षमता बांधणी, शेतकऱ्यांच्या शेतीमाल व महिला बचतगटांच्या उत्पादनाच्या खरेदी-विक्रीची व्यवस्था करणे आणि कृषी व कृषी आधारित जीवनाश्यक वस्तूंच्या विविध व्यवसायातून आर्थिक उलाढाल वाढविण्यासाठी शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत २५ डिसेंबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत राज्यात ‘अटल महापणन विकास अभियान’ राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अकोला व वाशिम जिल्ह्यातील विशेष कार्यकारी सहकारी सोसायट्या आणि खरेदी-विक्री संघांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापकांची कार्यशाळा ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता अकोल्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत अहमदनगर येथील निर्मिती प्रतिष्ठानचे संचालक गणेश देशमुख यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे, जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे, वाशिमचे जिल्हा उपनिबंधक डी.आर. खाडे, जिल्हा पणन अधिकारी मनोज बाजपेयी सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणाच्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.