अकोला येथील अथर्व तायडे, आदित्य ठाकरे यांची दुलीप चषक क्रिकेट स्पर्धेकरिता निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 02:43 PM2024-08-20T14:43:12+5:302024-08-20T14:43:25+5:30
Duleep Trophy: अनंतपूर (आंध्रप्रदेश) येथे ५ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या दुलीप चषक स्पर्धेकरिता भारत 'डी' संघात अकोला क्रिकेट क्लब तथा विदर्भ क्रिकेट संघटनेचा सलामीचा डावखुरा फलंदाज अथर्व तायडे व शैलीदार मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे यांची निवड झाली आहे.
अकोला - अनंतपूर (आंध्रप्रदेश) येथे ५ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या दुलीप चषक स्पर्धेकरिता भारत 'डी' संघात अकोला क्रिकेट क्लब तथा विदर्भ क्रिकेट संघटनेचा सलामीचा डावखुरा फलंदाज अथर्व तायडे व शैलीदार मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे यांची निवड झाली आहे.
अथर्व तायडे हा सलामीला खेळणारा डावखुरा शैलीदार फलंदाज असून, यापूर्वी त्याने १६, १९, २३ वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व तसेच १९ व २३ वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. रणजी ट्रॉफी व भारतात सर्वात प्रतिष्ठीत असणारी इराणी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व केले असून, अथर्वच्या नेतृत्वात विदर्भ संघ हा १९ वर्षीय स्पर्धेत अजिंक्य राहिला आहे. यावर्षी आय.पी.एल स्पर्धेत अथर्वने पंजाब किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. शैलीदार मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे याने यापूर्वी १६, १९, २३ स्पर्धेत विदर्भ तथा मध्यविभाग संघाचे प्रतिनिधित्व केले असून, १९ वर्षीय भारतीय संघाकडून आशिया चषक (मलेशिया) तर न्यूझीलंड येथे झालेल्या १९ वर्षीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
इराणी ट्रॉफी व रणजी ट्रॉफी स्पर्धेत तो खेळला आहे. दोन्ही खेळाडूंनी यावर्षीच्या रणजी करंडक स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल असून, विदर्भ संघाने यावेळी मुंबई संघासोबत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चांगली झुंज दिली होती. या दोन्ही खेळाडूंनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांची करांना स्पर्धेसाठी निवड झाली आहे.