एटीएमची केली पूजा; मनसेचे आंदोलन
By admin | Published: May 1, 2017 08:20 PM2017-05-01T20:20:13+5:302017-05-01T20:52:21+5:30
अकोला: नोटाबंदीनंतर काही महिने नोटांची चणचण भासल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली असताना, गत काही दिवसांपासून पुन्हा तीच परिस्थिती समोर आली आहे.
अकोला: नोटाबंदीनंतर काही महिने नोटांची चणचण भासल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली असताना, गत काही दिवसांपासून पुन्हा तीच परिस्थिती समोर आली आहे. शहरातील बहुतांश राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या ‘एटीएम’ केंद्रांमध्ये ठणठणाट असल्यामुळे नागरिकांना पैसे मिळेनासे झाले आहे. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी अकोट फैल भागातील स्टेट बँकेच्या एटीएमची पूजा करून अभिनव आंदोलन केले.
शुक्रवार व शनिवारी ठणठणाट होता. यामुळे पैसे काढण्यासाठी नागरिकांना भर उन्हात पायपीट करावी लागल्याचे चित्र दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील राष्ट्रीयीकृत व खासगी एटीएममध्ये पैशांची प्रचंड चणचण आहे. काही एटीएम मशीन सुरू राहत असल्या, तरी त्यात नोटा नसल्याने नागरिकांना आल्या पावली मागे फिरावे लागत आहे. अकोट फैल भागातील एटीमएम गत अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. यासाठी मनसेच्या वतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महानगर उपाध्यक्ष चंदू अग्रवाल, मनोज अढागळे, आनंद चवरे, कलावती मानवटकर, नंदा अढागळे, सुचित्रा सिरसाट, रवी बनकर, रोनीत शेंडे, दुर्गेश कदम, रोहित बन्सोड, राजेश पवार, गणेश बोबटे, सचिन कांबळे, संदीप भांबोरे, नितीन ससाने, अजय शेलार, संगीता अढागळे आदी उपस्थित होते.