महिलांवरील अत्याचार थांबता थांबेना; वर्षभरात ६९ बलात्कार; १९९ विवाहित महिलांचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 03:22 PM2018-03-08T15:22:09+5:302018-03-08T15:22:09+5:30
अकोला : जिल्ह्यात गत एक वर्षाच्या कालावधीत तब्बल ६९ युवतींवर बलात्कार करण्यात आला असून, तब्बल १९९ विवाहित महिलांचा छळ झाल्याचे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.
- सचिन राऊत,
अकोला: महिलांवर होणाºया अत्याचाराला आळा घालण्यासाठी कायद्यात अनेक दुरुस्त्या करून कठोर कायदा करण्यात येत असला, तरीही विकृत मनोवृत्तीवर उपाय नसल्याने अकोला जिल्ह्यातच नव्हे, तर देशभर महिला अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. एकट्या अकोला जिल्ह्यात गत एक वर्षाच्या कालावधीत तब्बल ६९ युवतींवर बलात्कार करण्यात आला असून, तब्बल १९९ विवाहित महिलांचा छळ झाल्याचे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.
अकोला जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांतर्गत १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या एक वर्षाच्या कालावधीत तब्बल ६९ महिला, युवती व अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांच्यावर जबरी संभोग करण्यात आला आहे. तर विवाहित असलेल्या १८५ महिलांचा सासरच्या मंडळीकडून विविध कारणांसाठी शारीरिक व मानसिक छळ झाल्याचे हृदयद्रावक वास्तव आहे. यासोबतच जिल्ह्यातील नऊ विवाहित महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांची हत्या झाल्याचेही आकडेवारीवरून समोर आले आहे. पाच विवाहित महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहे. यावरून महिलांवर अत्याचार करणाºयांच्या मुसक्या आवळण्यासाठी होणारे प्रयत्न अद्यापही तुटपुंजेच असल्याचे दिसून येत आहे. महिलांसोबतच लहान मुलींवर अत्याचार झाल्याची प्रकरणेही समोर आली असून, त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
एक महिन्यात १० बलात्कार
१ ते ३१ जानेवारी २०१८ या एक महिन्यात तब्बल १० मुलींवर बलात्कार झाल्याचे वास्तव आहे, तर तीन विवाहित महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांचा बळी घेण्यात आला आहे. नऊ महिलांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले आहे. यावरून या वर्षामध्येही शारीरिक व मानसिक छळासोबतच महिलांचे चार भिंतीच्या आत छळाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
कायद्याचा गैरवापरही धोक्याचा
काही महिलांकडून कठोर कायद्याचा गैरवापर करण्यात येत असल्याचेही खळबळजनक वास्तव आहे. सिंधी कॅम्पमधीलच एका युवकाचा अशाच प्रकरणात बळी गेल्याचे उदाहरण ताजे आहे. यावरून महिला व युवती कुणाच्याही बोलण्यात येऊन विनयभंग व बलात्काराची खोटी तक्रार देण्याचे प्रमाणही वाढल्याचे पोलीस अधिकाºयांचे म्हणणे आहे. यामध्ये बहुतांश वेळा कायद्याचा गैरवापर करण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती पोलीस सूत्रांनी दिली.