संत तुकाराम रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न करा
By admin | Published: August 31, 2016 02:50 AM2016-08-31T02:50:19+5:302016-08-31T02:50:19+5:30
कृषिमंत्र्यांचे अधिष्ठातांना आदेश; कर्करोग रुग्णांसाठी लिनॅक मशीन देण्याचे आश्वासन.
अकोला, दि. ३0 : पश्चिम विदर्भातील कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी आधार असलेले संत तुकाराम रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित करण्याबाबत प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे आदेश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना रविवारी दिले आहेत. संत तुकाराम रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करू, असेही कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी स्पष्ट केले. यासोबतच संत तुकाराम रुग्णालयातील कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली लिनॅक मशीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी दुपारी संत तुकाराम कर्करोग रुग्णालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, महापौर उज्ज्वला देशमुख, मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, माजी महापौर सुमन गावंडे, कृषी विद्यापीठ कार्यकारी समितीचे सदस्य वसंत बाछुका, नगरसेवक गोपी ठाकरे आदी होते. ना. फुंडकर यांनी रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांची चौकशी केली. कार्यक्रमामध्ये संत तुकाराम रुग्णालय हे पश्चिम विदर्भातील कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी आधार आहे. असे सांगत ना. फुंडकर यांनी संलग्नीकरणाबाबत आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू आणि रुग्णालयांच्या संलग्नीकरणासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. तसेच कर्करोग रुग्णांच्या उपचार व निदानासाठी लिनॅक मशीन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही फुंडकर यांनी दिले. संस्थेचे अध्यक्ष गिरीश अग्रवाल यांनी रुग्णालयात चालविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. जगन्नाथ ढोणे यांनीही लिनॅक मशीन रुग्णांसाठी किती गरजेची आहे, याबाबत माहिती दिली. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सुशील अग्रवाल, डॉ. राजकुमार अग्रवाल, किरण अग्रवाल, डॉ. गणपती भट, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन.के. माहेश्वरी, डॉ. तिलक चांडक, डॉ. के. ओ. शर्मा, अनिल कौसल, जयंत ढोमणे, विक्रम गावंडे, मधु अवचार, शैलेश देशमुख, श्याम रेळे आदी उपस्थित होते.