आॅटोचालकावर प्राणघातक हल्ला; धारदार शस्त्रांनी वार; हातपाय मोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 03:35 PM2019-01-30T15:35:38+5:302019-01-30T15:35:48+5:30
अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुकाराम चौक ते मलकापूरदरम्यान एका आॅटोचालकावर कारमध्ये आलेल्या तिघांनी तसेच आॅटोत असलेल्या आणखी दोन जणांनी सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.
अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुकाराम चौक ते मलकापूरदरम्यान एका आॅटोचालकावर कारमध्ये आलेल्या तिघांनी तसेच आॅटोत असलेल्या आणखी दोन जणांनी सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात नियाज अहमद कुरेशी हा आॅटोचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्या पायाला व हाताला दुखापत झाली आहे.
अकोट फैलातील रहिवासी नियाज अहमद कुरेशी उमर (४२) यांनी इंडसइंड बँकेकडून अर्थसाहाय्य घेऊन आॅटो खरेदी केला. त्यानंतर आॅटोमध्ये प्रवासी वाहतुकीचे कामकाज ते करीत आहेत. सोमवारी रात्री उशिरा रेल्वे स्टेशनवर प्रवासी वाहतुकीसाठी उभे असताना दोन युवक त्यांच्याकडे आले. तसेच गोरक्षण रोडवरील मलकापूर येथे जाण्यासाठी त्यांनी नियाज अहमद यांचा आॅटो भाडेतत्त्वावर घेतला. आॅटोचालक या दोघांना घेऊन मलकापूरकडे जात असताना तुकाराम चौकाच्या समोर गेल्यानंतर आॅटोमधील दोघांनी त्यांना आॅटो थांबविण्यास सांगितले. आॅटोचालकाने आॅटो थांबवताच सदर दोघांनी त्यांच्या आॅटोची चाबी काढून घेत सदर आॅटो अर्थसाहाय्य घेऊन घेतल्याची आरडा-ओरड करीत आॅटोला लाथाबुक्क्या मारल्या. आॅटोचालकाने या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर दोघांनी नियाज अहमद यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर पाठीमागून आलेल्या कारमधून तीन युवक उतरले व त्यांनीही आॅटोचालकास बेदम मारहाण करीत चाकू व धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये आॅटोचालक नियाज अहमद गंभीर जखमी झाल्यानंतर या पाचही जणांनी घटनास्थळावरून पळ काढला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नियाज अहमद यांना खदान पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता हात व पायाला फ्रॅक्चर असल्याचा अहवाल समोर आला आहे. या प्रकरणी नियाज अहमद यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी अज्ञात पाच ते सहा जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपी फरार झाले असून, खदानचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला आहे.