Attack on Sharad Pawar House: प्रकाश आंबेडकरांचे विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर गंभीर आरोप, निलंबित करण्याची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 12:54 PM2022-04-13T12:54:30+5:302022-04-13T12:55:07+5:30
Attack on Sharad Pawar House: शरद पवार यांच्या निवासस्थावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी Prakash Ambedkar यांनी Vishwas Nangre-Patil यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
अकोला - गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी आक्रमक मोर्चा नेला होता. त्यावेळी आंदोलकांकडून पवारांच्या निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याने हल्ल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर या हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यासह शेकडो एसटी कर्मचाऱ्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, शरद पवार यांच्या निवासस्थावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सिल्वर ओकवरील हल्ला हा पूर्वनियोजित होता. या हल्ल्याची राज्य शासनाला कल्पना होती. तसे पत्र आले होते. मात्र विश्वास नांगरे-पाटील यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केले. आता या घटनेचा त्यांच्यावरच चौकशी समितीचा भार देणे आणि त्यांना चौकशी समिती प्रमुख करणे हे चुकीचे आहे. त्यांना तातडीने पदावरून काढून टाकण्यात यावे, तसेच त्यांची चौकशी करण्यात यावी, त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केला.
विश्वास नांगरे-पाटलांनी गुप्तचर संस्थेचा अहवाल दाबून ठेवला, असा आरोप आंबेडर यांनी केला. तसेच मुंबईवरील हल्ल्याची माहितीही कोस्टल गार्डने दिली होती. तीसुद्धा ४८ तास दाबून ठेवली होती. त्यामुळे आता धडा घ्यावा, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांनाही महत्त्वाचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, कोर्टाने तुम्हाला २२ ताखेपर्यंत संधी दिली आहे. एसटी महामंडळ शाबूत राहिलं पाहिजे, असं वाटत असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी विनाअट कामावर रुजू व्हावं. एसटी महामंडळ हे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण होऊ शकत नाही, हे मी जाहीरपणे सांगतो. जी मागणी मान्यच होऊ शकणार नाही ती लांब पल्ल्याचा इश्शू म्हणून पाहिलं पाहिजे. एसटीचे कर्मचारी कायदेशीर सल्लागांरांमुळे आणि त्यांच्या नेत्यांमुळेही अडचणीत आले आहे, असेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.