पोलिसांवर हल्ला करून गुरे पळवली; दोघांना अटक
By admin | Published: July 11, 2017 01:17 AM2017-07-11T01:17:03+5:302017-07-11T01:38:33+5:30
हिवरखेडजवळील घटना; १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरखेड: गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या हिवरखेड पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला करून गुरे पळवून नेली. ही घटना हिवरखेडजवळ १० जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी १५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे.
मध्य प्रदेशातील सातपुडा जंगलातून अवैधपणे गुरे हिवरखेड येथे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनांवर पाळत ठेवली. सकाळी ९.३० वाजता दोन वाहनांमध्ये गुरे येत असल्याचे दिसताच ठाणेदार निशांत मेश्राम यांच्या पथकाने ही वाहने अडवली. त्यांची तपासणी केली असता वाहन क्र.एमएच ३० एबी ४२०२ यामध्ये तीन बैल तर वाहन क्र.एमएच ३० एबी १९८२ मध्ये पाच बैल असल्याचे आढळले. पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांना बैलांच्या खरेदीविषयी कागदपत्रे मागितली असता त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे आढळली नाहीत. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईची माहिती हिवरखेड येथील काही लोकांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली.
तसेच पोलिसांबरोबर धक्काबुक्की केली व दुसऱ्या वाहनातील पाच बैल पळवून नेले. अचनाक घडलेल्या घटनेमुळे पोलिसही गोंधळून गेले होते. या प्रकरणी हेकॉ नंदू सुलताने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी अ. शरीफ अ. लतीफ रा. धुलघाट, शे. रईस इक्रमोद्दीन यांच्यासह १५ जणांविरुद्ध भादंवि १४३, ३५३, ३३२, १८६, १२०ब, ५ (५ अ), ९, ९(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास ठाणेदार निशांत मेश्राम, नंदू सुलताने, नीलेश तायडे, राजू इंगळे, अमोल पवार करीत आहेत.