बोगस दिव्यांगांचा घरकूल लाटण्याचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:21 AM2021-05-25T04:21:24+5:302021-05-25T04:21:24+5:30
माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या कार्यकाळात सन २०१९-२० मध्ये मंजूर केलेल्या घरकुल यादीमध्ये फेरबदल करून दलित समाजाला ...
माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या कार्यकाळात सन २०१९-२० मध्ये मंजूर केलेल्या घरकुल यादीमध्ये फेरबदल करून दलित समाजाला घरकुलापासून दूर ठेवल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांनी विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला, गटविकास अधिकारी पंचायत समिती अकोला यांना लेखी तक्रारसुद्धा दाखल केली होती. मात्र, या प्रकरणाबाबत ग्रामपंचायतमध्ये विचारणा केली असता, तत्कालीन ग्रामपंचायतीने घरकुल यादी बनविताना शासनाने ठरविलेल्या दिशानिर्देशाचे पालन केले नसल्याचे सरपंच प्रगती नवनीत पांडे यांनी सांगितले. सर्वप्रथम मंजूर ३७ लाभार्थ्यांमध्ये चार लाभार्थी हे दिव्यांग असल्याचे दाखवून त्यांचा घरकुलाच्या यादीत समावेश करण्यात आला होता. याबाबत पंचायत समिती प्रशासनाने दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले असता, या चारही लाभार्थ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे पंचायत समितीने त्यांचे घरकुल रद्द केले. तसेच एक लाभार्थी अनुसूचित जात प्रवर्गाचा दाखविण्यात आला. त्यामुळे ५ लाभार्थ्यांना केवळ तत्कालीन ग्रामपंचायतीच्या चुकीमुळे घरकुलापासून वंचित राहावे लागले. या यादीबाबत लेखी स्वरूपाच्या तक्रारी ग्रामपंचायतीला दाखल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने २० मार्च २०२१ रोजी हा विषय ग्रामसभेत घेऊन सुधारित यादी पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली. सर्व पात्र लाभार्थी हे अनुसूचित जातीचे आहेत. उर्वरित ३२ सुधारित यादीबाबत मासिक सभेमध्ये ठराव घेऊन याबाबत पंचायत समितीला कळविण्यात आले आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने लाभार्थ्यांना हप्ता मिळण्यास विलंब झाला असला, तरी काही दिवसांत ३२ जणांना रमाई घरकुल योजनेतील पहिला हप्ता संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. नियमानुसारच लाभार्थींना घरकुलाचा लाभ देण्यात येईल. यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
- प्रगती नवनीत पांडे, सरपंच कुरणखेड