शेतकरी संघटनेच्या वतीने प्रतिबंधित एचटीबीटी बियाणांच्या लागवडीचा प्रयत्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:52+5:302021-06-11T04:13:52+5:30
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ललीत बहाळे यांचे हस्ते व माहिती तंत्रज्ञान आघाडी जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकार यांचे प्रमुख उपस्थितीत फलकाचे ...
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ललीत बहाळे यांचे हस्ते व माहिती तंत्रज्ञान आघाडी जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकार यांचे प्रमुख उपस्थितीत फलकाचे अनावरण करण्यात आले. पोलिसांनी सकाळी तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली. त्यानंतर राष्ट्रीय कार्याध्यक्ष ललीत बहाळे यांचे नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फलक हातात घेऊन नारे देत, उद्घाटन स्थळी प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांनी शेतकरी संघटनेचे फलक जप्त केले. यावेळी पोलीस व कृषी विभागाचा विरोध झुगारून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक एचटीबीटी बियाण्यांची पेरणी केली.
फोटो:
पोलिसांनी शेतकऱ्यांना घेतले ताब्यात
शेतकरी संघटनेचे ललीत बहाळे, लक्ष्मीकांत कौठकार, सतीश देशमुख, विलास ताथोड, निलेश नेमाडे, दिनेश देऊळकार, दादाभाऊ टोहरे, दिलीप वानखडे, मोहन खिरोडकार, संजय ढोकणे, जाफरखॉ, आकाश देउळकार, अजित कळसकर, गोपाल निमकर्डे, दिनेश गिर्हे या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून देण्यात आले. घटनास्थळावर सकाळपासून तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे, पं. स. कृषी अधिकारी विठ्ठल थुल, अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड, हिवरखेड ठाणेदार धीरज चव्हाण, पोलीस पाटील हितेश हागे उपस्थित होते.
कोरोना महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी व शांतता व सुव्यवस्थेकरिता पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कृषी विभागाच्या तक्रारीनुसार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल.
-ज्ञानोबा फड, ठाणेदार अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन
एचटीबीटी बियाण्यांची लागवड बेकायदेशीर आहे. त्याला शासनाकडून मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एचटीबीटी वाणाची लागवड करू नये.
-सुशांत शिंदे, तालुका कृषी अधिकारी अकोट
शेतकरी संघटनेचा सत्याग्रह
एचटीबीटी कपाशी बियाणांची लागवड करण्यास महाराष्ट्रात शासन बंदी आहे. परंतु एचटीबीटी कपाशीचे बियाणे हे उत्पादन वाढविणारे असून, यामुळे शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी गत काही वर्षांपासून शेतकरी संघटनेच्या वतीने या बियाणांच्या समर्थनार्थ किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह राबवून, एचटीबीटी बियाणांचे शेतकऱ्यांना महत्त्व पटवून देण्यासोबतच, त्यांच्या शेतामध्ये या प्रतिबंधित बियाणांची लागवड करण्यात येते.