तीन मोरांची शिकार करण्याचा प्रयत्न उधळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:19 AM2021-05-20T04:19:33+5:302021-05-20T04:19:33+5:30
सध्या ऊन्हाळ्याचे दिवसात शेतात पाणवठे नसल्यामुळे वन्यप्राणी पाण्याचे शोधात गाववस्तीपर्यत येत आहेत. ही संधी साधत शिकारी वन्य प्राण्यांची ...
सध्या ऊन्हाळ्याचे दिवसात शेतात पाणवठे नसल्यामुळे वन्यप्राणी पाण्याचे शोधात गाववस्तीपर्यत येत आहेत. ही संधी साधत शिकारी वन्य प्राण्यांची शिकार करीत आहेत. बुधवारी हातरूण ते शिंगोली दरम्यान रस्त्याच्या बाजूला पाईपलाईन लिकेजवरील पाण्याच्या डबक्याजवळ तीन मोर पाणी पिण्यासाठी आले. याठिकाणी शिकाऱ्यांनी आधीच विष लावलेले मक्याचे दाणे टाकून ठेवले होते. मोरांनी विष लावलेले दाणे खाल्ले. यामुळे मोर बेशुद्ध झाले. या बेशुद्ध मोरांची शिकार करण्याचा प्रयत्न काही लोक करीत असल्याचे हातरुण येथील आसिफ शहा यांना दिसले. त्यांनी तातडीने उरळ पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार अनंत वडतकार, बिट जमादार विजय झाकर्डे, वाहतुक पोलीस किशोर पाटील, पद्मसिंह बयस, पोलीस पाटील संतोष बोर्डे हे तात्काळ घटनास्थळी पोहचले. परंतु तोपर्यंत शिकारी पळून गेले. याप्रकरणी वन विभागाने अज्ञात शिकाऱ्यांविरूद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
फोटो:
मोरांना वाचविण्याचा प्रयत्न निष्फळ
विष लावलेले दाणे खाल्ल्यामुळे मोर अस्वस्थ झाले. पोलीस पाटील बोर्डे व उपस्थित नागरिकांनी मोरांना पाणी पाजून वाचविण्यासाठी धडपड केली. परंतु मोरांचा मृत्यू झाला. वनपाल जी.डी. इंगळे, वनरक्षक जी.पी. घुडे, मानद वन जीवरक्षक बाळ काळणे, म्हातारमारे, चालक यशपाल इंगोले, पवन भगत यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता मोरांना ताब्यात घेतले.