दारूच्या व्यवसायासाठी पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न
By Admin | Published: May 22, 2017 01:55 AM2017-05-22T01:55:37+5:302017-05-22T01:55:37+5:30
खेट्री येथील घटना, महिलेची पोलिसात धाव
लोकमत न्यूज नेटवर्क
खेट्री : महिलांवर अत्याचार थांबविण्यासाठी शासन नवनवीन कायदे बनवते; परंतु महिलांवरील अत्याचार थांबता थांबेनात. पातूर तालुक्यातील ग्रामीण भागाात सध्या अशीच परिस्थिती आहे. खेट्री येथील महिलेला पतीने दारूचा व्यवसाय करण्यासाठी मद्य प्राशन करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.
खेट्री येथील वनिता तिडके या महिलेवर पतीकडून अत्याचार सुरू असल्याची बाब २१ मे रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या महिलेला तिचा पती विलास तिडके याने दारूचा व्यवसाय करण्यासाठी मद्य प्राशन करून राहत्या घरामध्ये कोंडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पतीच्या तावडीतून सुटून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पत्नीने पतीच्या तोंडावर ग्लास मारून जखमी केले. या घटनेमध्ये पती-पत्नी दोघेही जखमी झाले आहेत. तिचा पती तिला दारूचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करीत आहे. त्याला तिने नकार दिल्यामुळे पती गेल्या काही महिन्यांपासून तिला मारहाण करीत आहे. अखेर याबाबत महिलेने पोलिसात धाव घेऊन पतीविरुद्ध फिर्याद दिली असून पतीविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तथापि चान्नी पोलिसांनी पतीविरुद्ध भादंवि ३२३, ५०६ कलमानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून सदर प्रकरण चौकशीत ठेवले आहे.