घरकुल बांधकामाला गती देण्याचा प्रयत्न - विनोद वानखडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 05:57 PM2021-01-09T17:57:13+5:302021-01-09T18:09:10+5:30
Washim News वाशिम जिल्ह्यातील घरकुल बांधकामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे डॉ. विनोद वानखडे यांनी सांगितले.
वाशिम : अपूर्ण घरकुलांचे काम पूर्ण करणे, घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे, शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करणे आदी उद्देशाने वाशिमसह राज्यात महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मूळ उद्देश, अपूर्ण घरकुले, त्यामागील कारणे, अनुदान वितरण आदीसंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखडे यांच्याशी शनिवार संवाद साधला. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यातील घरकुल बांधकामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे डॉ. वानखडे यांनी यावेळी सांगितले.
महाआवास अभियानाचा उद्देश काय आहे?
अपूर्ण घरकुलांचे काम पूर्ण करणे, घरकुलासाठी लाभार्थीकडे जागा उपलब्ध नसल्यास सरकारी जागा उपलब्ध करून देणे, अतिक्रमण असल्यास नियमानुकूल करणे, जागा खरेदीसाठी अनुदानाव्यतिरिक्त बँकांकडून ७० हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे आदी उद्देशातून २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळात महाआवास अभियान राबविले जात आहे. वाशिम जिल्ह्यातही या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. ८ जानेवारी रोजी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनीदेखील वाशिम जिल्ह्यात या अभियानाचा आढावा घेतला.
या अभियानांतर्गत कोणत्या योजनेबाबत जनजागृती केली जात आहे.?
पात्र लाभार्थीला हक्काचे घर मिळण्यासाठी शासनाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, आदीम आवास, अटल बांधकाम कामगार आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना, ग्रामीण भागातील शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठीची योजना आदी योजना राबविण्यात येत आहेत. या योजना ग्रामीण भागातील लाभार्थींपर्यंत पोहचविण्यात येत आहेत.
गत चार वर्षात किती घरकुले मंजूर आहेत ?
ग्रामीण भागात रमाई आवास योजनेंतर्गत गत चार वर्षांमध्ये ७१५४ घरकुले मंजूर झालेली आहेत. यापैकी जवळपास चार हजारावर घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले असून, उर्वरीत घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
घरकुल बांधकामासाठी लाभार्थींना मोफत रेती मिळू शकली नाही?
जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव अद्याप झाले नाहीत. रेतीघाट लिलाव झाल्यानंतर शासन नियमानुसार लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी मोफत रेती मिळावी याकरीता संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाईल.