खेळण्यातील नाेटा व्यवहारात चालविण्याचा प्रयत्न फसला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 07:02 PM2022-02-03T19:02:23+5:302022-02-03T19:02:40+5:30
Crime News : तीन आराेपींना पाेलिसांनी अटक केली असून, एक जण फरार झाला आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा (अकाेला): लहान मुलांच्या खेळण्यातील नाेटा व्यवहारात चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्या टाेळीचा तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण फाटा येथे पर्दाफाश झाला असून, पाचशेच्या ४७९२ नाेटा जप्त केल्या. ही कारवाई तेल्हारा पाेलिसांनी २ फेब्रुवारी राेजी रात्री केली. तीन आराेपींना पाेलिसांनी अटक केली असून, एक जण फरार झाला आहे.
तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण फाटा येथे लाेकांना बनावट नोटा देऊन त्या बदल्यात सुटे खऱ्या नोटा घेत असल्याची माहिती पाेलिसांना गस्तीवर असताना मिळाली. पंचगव्हाण फाटा येथे चार जण भारतीय बच्चाे का बॅंक असे लिहिलेल्या बनावट नोटा देऊन त्या बदल्यात सुटे म्हणून खऱ्या नोटा घेऊन लोकांना फसवित असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्यासह पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाेलिसांनी झाडाझडती केली असता चलनी नाेटासारख्या दिसणाऱ्या ५०० रुपये भारतीय बच्चाे का बॅंक असे लिहिलेले चार बंडल, त्यात प्रत्येकी बंडलमध्ये ११९८ नाेटा आढळल्या. प्रत्येक बंडलाच्या खाली व वर प्रत्येकी एक नाेट चलनातील दिसून आली. तिघांना ताब्यात घेतले तर एक जण घटनास्थळावरून फरार झाला. अमित आत्माराम कटारे, (वय २७) रा. चिस्ताळा ता. मानोरा जि. वाशिम, अमोल गोविंद कटारे (वय २२) रा. चिस्ताळा ता. मानोरा जि. वाशिम आणि वैभव चंदु दयाळ (वय २२) रा. हिवरदरी ता. महागाव जि. यवतमाळ अशी अटक केलेल्या आराेपींची नावे असून, विजय ठाकूर रा. खामगाव जि. बुलडाणा हा आराेपी फरार आहे.
तिघांकडून पोलिसांनी कार क्र. एमएच४३ एएल ७७६ किंमत दहा लाख, दुसरी कार क्र. एमएच ०३ सिएस २७४३ किमत १२ लाख असा एकूण २२ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल व तीन मोबाईल जप्त केले. अटकेतील तिघांवर भादंविच्या कलम ४२०, ४८९-ब, ४८९-ई, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.