हमसफर एक्स्प्रेसमध्ये अटेंडेन्स झोपेत; मायलेकांना थंडीत कुडकुडत करावा लागला प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 10:44 AM2019-11-06T10:44:45+5:302019-11-06T10:44:52+5:30
अटेंडेन्स आणि टीसी न आल्याने जो त्रास झाला त्याची गंभीर तक्रार शिखा पाण्डेय यांनी अकोल्यात नोंदविली आहे.
अकोला: हमसफर एक्स्प्रेसमधील अटेंडन्स सेवा न देता झोपा काढीत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. रात्री २ ते पहाटेपर्यंत अटेंडन्स आणि टीसी दोघेही न फिरकल्याने प्रवासी मायलेकांना थंडीत कुडकुडत प्रवास करावा लागला. अकोल्यात उतरताच या महिलेने स्टेशन उपअधीक्षकांकडे धाव घेत तक्रार नोंदविल्याची घटना उजेडात आली आहे. आता या तक्रारीची दखल रेल्वे प्रशासनाकडून कितपत घेतल्या जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हल्ली अकोल्यात निवास असलेल्या शिखा पाण्डेय आणि त्यांचा शाळकरी मुलगा हमसफर एक्स्प्रेस रेल्वे गाडीने (ट्रेन.नं. १२७५२) रविवारच्या उत्तररात्री २ वाजता बिना येथील बी-५ या वातानुकूलित कोचमध्ये आरक्षित आसनावर बसल्या. बराच वेळ होऊनही अटेंडेन्स आला नाही. अखेर मायलेकांनी संपूर्ण बोगीत शोध घेतला. टीसी आणि अटेडेंन्स आढळून न आल्याने मायलेकांनी लगेजमधील ऊबदार कपडे काढून कसाबसा प्रवास केला. रविवारच्या उत्तररात्री २ ते सोमवारच्या पहाटेपर्यंत अटेंडेन्स आणि टीसी न आल्याने जो त्रास झाला त्याची गंभीर तक्रार शिखा पाण्डेय यांनी अकोल्यात नोंदविली आहे.
तक्रार घेण्यासही केली टाळाटाळ
शिखा पाण्डेय यांनी झालेल्या त्रासाची तक्रार नोंदविण्यासाठी रेल्वेत तक्रार पुस्तिका मागितली; मात्र त्यांना अकोला रेल्वेस्थानकावर तक्रार करण्याचा सल्ला दिला गेला. अकोला रेल्वे स्थानकाचे अधीक्षक यांच्याकडे धाव घेतली असता त्यांचे कक्षास कुलूूप होते. उपअधीक्षक कार्यालय गाठले असता त्यांनी टाळाटाळ केली. अखेर प्लटफार्मवरून रेल्वे निघाल्यानंतर पाण्डेय यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली.
कंत्राट पद्धतीमुळे प्रवासी त्रासले
रेल्वे प्रशासनाने आरक्षण बोगीतील सर्व सेवा आता कंत्राटी पद्धतीने आउटसोर्सिंगला दिल्या आहे. त्यामुळे खासगी कंपनीची माणसे कुणाचे ऐकत नाही. अनेकदा ते दारू पिऊन असतात. प्रवाशांसोबत अरेरावी करतात. अशा तक्रारी दररोज येत असतानादेखील रेल्वे प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे. रेल्वे प्रशासनाची चुप्पी म्हणजे अप्रत्यक्ष या कृत्यांना समर्थन ठरत आहे.