सावधान, डेंग्यू आलाय!
By admin | Published: July 8, 2016 02:25 AM2016-07-08T02:25:55+5:302016-07-08T02:25:55+5:30
खासगी रुग्णालयात आढळला डेंग्यूसदृश रुग्ण; मलेरिया विभाग निष्क्रिय.
आशीष गावंडे / अकोला
महापालिकेच्या मलेरिया विभागाच्या निष्क्रियतेमुळे शहरात डेंग्यूच्या आजाराने प्रवेश केला असून, गुरुवारी शहरातील खासगी रुग्णालयात डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील पानथळ भागात साचणार्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असताना अद्यापपर्यंतही यावर उपाययोजना होत नसल्यामुळे आगामी दिवसांत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होणार असल्याची दाट शक्यता आहे.
मागील चार वर्षांपासून अकोलेकरांना डेंग्यूसदृश आजाराने हैराण करून सोडले आहे. पावसाळा सुरू होताच डेंग्यू, मलेरियाच्या आजारांत वाढ होत असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते.
एडिस एजिप्ताय या डासाने चावा घेतल्यास डेंग्यूचा फैलाव होतो. डेंग्यू किंवा मलेरिया झालेले अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल न होता खासगी रुग्णालयात दाखल होतात. जुने शहरातील काही खासगी रुग्णालयांत डेंग्यूसदृश आजाराचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. या दोघांवरही उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र, शहरातील इतरही खासगी रुग्णालयात भरती होणार्या अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती आहे. जीवघेण्या डेंग्यूचा धोका ओळखून महापालिकेच्या मलेरिया विभागासह वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने वेळीच उपाययोजना राबविणे अपेक्षित असताना संबंधित विभाग कमालीचे निष्क्रिय ठरत असल्याचे दिसून येते. डासांची पैदास रोखण्यासाठी घरा-घरांमध्ये धुरळणी करणे व साचलेल्या पाण्यांमध्ये औषध फवारणी करून पाणी वाहते करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रभावी मोहीम राबवण्याची गरज आहे.