शेट्टी-खोतांच्या वादात तुपकरांच्या भूमिकेकडे लक्ष!

By admin | Published: May 22, 2017 01:36 AM2017-05-22T01:36:44+5:302017-05-22T01:50:26+5:30

‘स्वाभिमानी’ नेत्यांच्या मैत्रीचा पोपट मेलाच : केवळ औपचारिक शिकामोर्तब बाकी !

Attention to Tupkar's role in Shetty-Khata's debate! | शेट्टी-खोतांच्या वादात तुपकरांच्या भूमिकेकडे लक्ष!

शेट्टी-खोतांच्या वादात तुपकरांच्या भूमिकेकडे लक्ष!

Next

राजेश शेगोकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राजा अन् त्याचा आवडता पोपट, ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. एका राजाचा आवडता पोपट मेला, ही वार्ता राजाला कशी सांगायची म्हणून मग पोपट निपचित कसा पडला आहे, अशी वर्णने केली जातात. खरे तर ही सर्व वर्णने पोपट मेलाच आहे, याची जाणीव करून देणारे असतात; फक्त प्रत्यक्षात तसे म्हटले जात नाही. नेमकी अशीच स्थिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन शीर्षस्थ नेत्यांमधील नात्याची आहे. स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत या दोन नेत्यांच्या मैत्रीचा पोपट मेलाच आहे; फक्त शिक्कामोर्तब तेवढे बाकी असल्याचे प्रत्यंतर विविध घटनांवरून येत आहे. या दोन नेत्यांच्या मैत्रीचे केवळ साक्षीदारच नव्हे, तर तणावाच्या प्रसंगी सेतू म्हणून काम करणारे वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांची या सर्व प्रकरणात प्रचंड कोंडी होत आहे. त्यामुळे उद्या खोत यांनी भाजपासोबत घरोबा केलाच, तर तुपकरांची भूमिका काय असेल, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
शरद जोशी यांच्या मुशीत तयार झालेले खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत व रविकांत तुपकर ही फळी सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतृत्व करीत आहे. शेतकरी कार्यकर्ता म्हणून राजकीय व सामाजिक कारकीर्द सुरू करणाऱ्या या नेत्यांची उभ्या महाराष्ट्रात शेतकरी नेते म्हणून आता चांगलीच ओळख निर्माण झाली आहे. या नेत्यांमध्ये रविकांत तुपकर हे वयाने सर्वात लहान, शेतकरी संघटनेत विदर्भ आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळून आपल्या नेतृत्वाची चुणूक त्यांनी दाखवल्यामुळेच राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी संघटना स्थापन करताच, तुपकरांना आपल्याकडे वळवून घेत राज्याच्या युवक आघाडीचे अध्यक्षपद बहाल केले. प्रारंभीच्या काळात सदाभाऊ खोत हे स्वाभिमानीमध्ये नव्हते, ते आपल्या डेअरी व्यवसायातच मग्न होते. त्यांना पुन्हा संघटनेत कार्यरत करण्यासाठी लहान भाऊ म्हणून तुपकरांनी राजू शेट्टींच्या सांगण्यावरून गळ घालत स्वाभिमानीमध्ये आणले व या तीन नेत्यांनी उभ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आंदोलन उभे करून, लक्ष वेधले. कालांतराने स्वाभिमानी संघटना महायुतीमध्ये सहभागी झाल्यांनतर राज्यात सत्ता आली व सत्तेमध्ये वाटा देताना भाजपाने स्वाभिमानीला राज्यमंत्रिपदाचे महामंडळ देऊ केल्यावर कुठलाही वाद न होता तुपकरांना महामंडळाचा लाल दिवा मिळाला, स्वाभिमानी संघटनेचा हा पहिला लाल दिवा होता, यावरून तुपकरांचे संघटनेतील महत्त्व अधोरेखित होते. हे सर्व या ठिकाणी उद्धृत करण्याचे कारण इतकेच, की या सर्व प्रवासात तुपकर व खोत यांच्यामध्ये निर्माण झालेल्या घरोब्याचा ऋणानुबंध आता परीक्षेच्या वळणावर येऊन ठेपला आहे. खोत यांच्या लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या नियोजनाची धुरा सांभाळण्यापासून, तर त्यांच्या मतदारसंघातील अनेक कार्यक्रम आंदोलनामध्ये सहभागी होत तुपकरांनी खोतांसोबतची मैत्री व नाते कायम टिकविले हे विशेष!
संघटनेतही सदाभाऊ खोत व तुपकर ही आक्रमक जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. सत्तेत सहभाग मिळाल्यावर या जोडीला लाल दिवा मिळाला; मात्र खोत यांना मंत्रिपद मिळाल्यावर त्यांची भाषा व महत्त्वाकांक्षा बदलल्याचा आरोप सातत्याने संघटनेतून व पक्षाबाहेरूनही होऊ लागला, अशा वेळी तुपकर हेच या दोन नेत्यांमधील संवादाचे सेतू होते; मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने तुपकरही हतबल झाले आहेत. खोत हे भाजपाच्या अधिक जवळ गेले असल्याचे खुलेआमपणे सांगितले जाऊ लागले असून, आता २९ मे रोजी इस्लामपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला आहे. हा सोहळा खोतांच्या भाजपा प्रवेशाचाच मार्ग प्रशस्त करणारा असल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत. ज्या प्रमाणे खोतांवर भाजपाने जाणीवपूर्वक जाळे फेकत त्यांचे मन वळविण्यात बऱ्यापैकी यश मिळविले असल्याची चर्चा आहे, त्याचप्रमाणे तुपकरांच्याही बाबतीत भाजपाच्या गोटातून चाचपणी केली जात आहे. यापूर्वीच त्यांना २०१२ च्या बुलडाणा जिल्हा परिषदेची उमेदवारी तसेच २०१५ च्या विधानसभा निवडणुकीसाठी बुलडाण्यातून उमेदवारीबाबत विचारणा झाली होती; मात्र तुपकरांचा जीव चिखली मतदारसंघात अडकला होता व हा मतदारसंघ स्वाभिमानीला सोडता आला नाही. पुढे महामंडळाचे अध्यक्षपद मिळाल्यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तुपकरांना अनेक प्रसंगी राजकीय बळ देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.
त्यामुळे खोतांसोबतच तुपकरांवरही भाजपा जाळे टाकत असल्याची शंका राजकीय क्षेत्रात व्यक्त होत आहे. उद्या खोत भाजपामध्ये गेल्यावर कदाचित स्वाभिमानीने महायुतीमधून बाहेर पडत सत्तेसोबत काडीमोड घेतला, तर तुपकरांना महामंडळाचे अध्यक्षपद सोडून संघटनेमध्ये क्रमांक दोनच्या नेतेपदी मिरवावे लागेल. त्यामुळे भाजपासोबत जाऊन सत्तेत सहभागी होत खोतांची पाठराखण करायची की संघटनेतच राहायचे, या तुपकरांच्या भूमिकेवरही विदर्भातील स्वाभिमानी संघटनेचे भविष्य अवलंबून राहणार आहे.

विदर्भात संघटना वाढीला खीळ बसली
रविकांत तुपकर यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा असणारे महामंडळ देऊन त्या माध्यमातून विदर्भात संघटना वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती. तुपकरांनी धडाकेबाज सुरुवात करीत बुलडाण्यानंतर वाशिम, अमरावतीमध्ये संघटेनची चांगली बांधणी केली; मात्र दरम्यानच्या काळात राजू शेट्टी व सदाभाऊ यांच्यामधील वाद वाढल्याने संघटनाबांधणीची प्रक्रिया मंदावली. सद्यस्थितीत अकोल्यातील बाळापूर व पातूर, यवतमाळमधील महागाव, पुसद, नागपूरमधील काटोल असे काही तालुके सोडले, तर विदर्भात स्वाभिमानीचा विस्तार होऊ शकला नाही.

सदाभाऊ खोत हे संघटनेमधील नेते आहेत. त्यांच्यासारखा नेता संघटनेतच राहावा, अशी माझी कार्यकर्ता म्हणून नेहमीच इच्छा व आग्रह राहिला आहे. मी सध्या स्वाभिमानी पदयात्रेच्या नियोजनात व्यस्त असल्याने मला इतर घडामोडींबाबत माहिती नाही. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हाच आमच्या समोरचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे माझी भूमिका काय राहील, याबाबत मी सध्या भाष्य करू इच्छित नाही, योग्य वेळी बोलू, संघटेनचा कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे, हीच माझी भूमिका आहे.
-रविकांत तुपकर,
अध्यक्ष वस्त्रोद्योग महामंडळ

Web Title: Attention to Tupkar's role in Shetty-Khata's debate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.