औटघटकेच्या सुवर्णपदकाने दानापूरची ‘आर्ची’ प्रकाशझोतात!

By admin | Published: July 11, 2017 01:28 AM2017-07-11T01:28:56+5:302017-07-11T01:28:56+5:30

अकोला : भुवनेश्वर येथे सध्या बाविसावी एशियन एथलेटिक्स स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत दानापूरची आंतरराष्ट्रीय धावपटू अर्चना अढाव हिने सुवर्णपदक पटकवले; मात्र तिच्या यशाचा हा आनंद औटघटकेचाच ठरला.

Audghatke's gold medal offers 'Archie' light! | औटघटकेच्या सुवर्णपदकाने दानापूरची ‘आर्ची’ प्रकाशझोतात!

औटघटकेच्या सुवर्णपदकाने दानापूरची ‘आर्ची’ प्रकाशझोतात!

Next

नीलिमा शिंगणे-जगड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अर्चना रामदास अढाव. काहीसे अनोळखी असलेले हे नाव कालपासून देशभरात चर्चेत आहे. ही चर्चा आहे यश आणि नियतीच्या एका फेऱ्याची. भुवनेश्वर येथे सध्या बाविसावी एशियन एथलेटिक्स स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील ८०० मीटर धावण्याची स्पर्धा होती. या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या दानापूरची आंतरराष्ट्रीय धावपटू अर्चना अढाव हिने सुवर्णपदक पटकवले होते; मात्र तिच्या यशाचा हा आनंद औटघटकेचाच ठरला. कारण, श्रीलंकन धावपटू निमाली वालीवर्षा कोंडा हिने अर्चनाने तिला धक्का मारल्याची तक्रार स्पर्धेच्या ज्युरीकडे केली. ज्युरीने ही तक्रार मान्य करीत दुसऱ्या क्रमांकावरील निमालीला सुवर्णपदक बहाल करण्याचा निर्णय दिला. तिच्या यशाने संपूर्ण स्टेडियमसह दानापूरसह संपूर्ण अकोला जिल्हाही न्हाऊन निघाला होता; मात्र नंतरच्या घटनेने यावर काहीसे विरजण पडले. दरम्यान, या घटनेने तिचे गाव दानापूरसह संपूर्ण अकोला जिल्हा हिरमुसला.
एथलेटिक्सच्या जगात अलीकडे अर्चनाने आपल्या वेगाने ‘तेल्हारा- एक्स्प्रेस’ नावाने संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष वेधून घेतले. मुळात अर्चनाचा दानापूर ते एशियन एथलेटिक्स स्पर्धेपर्यंतचा हा प्रवास अनेक आव्हाने आणि खाचखळग्यांनी भरलेला. १९९७ मध्ये अर्चना तीन महिन्यांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. अर्चनाला तिच्यासह आणखी दोन बहिणी. तिच्या आईने आपले सासू-सासरे आणि दिरांच्या मदतीने कुटुंबाचा गाडा हाकलायचा प्रयत्न केला. पहिली ते सातवीपर्यंतचे अर्चनाचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर आठवा वर्ग ती गावातीलच हनुमानप्रसादसाह जनता विद्यालयात शिकली. याच ठिकाणी तिच्या आयुष्याला पैलू पाडणारे तिचे क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षक नितीन मंगळे तिला भेटले. तिच्यातील प्रतिभा आणि ध्येयाला मंगळे सरांनी वाट करून दिली. अन् येथूनच राष्ट्रीय स्तरावर धावणे आणि लांब उडीत तिने नैपुण्य दाखवायला सुरुवात केली. यामुळेच २०१२ मध्ये तिची निवड पुण्यातील बालेवाडीच्या क्रीडाप्रबोधिनीत झाली अन् तिचा पुढचा प्रवास सुरू झाला. तिच्या प्रशिक्षकांना तिच्या या कामगिरीचा सार्थ अभिमान आहे.
अर्चना ही आई ताई अढाव यांच्यासह पुण्यात असते. तर तिचे आजी-आजोबा आणि काका दानापुरात शेती करतात. क्रीडाप्रबोधिनीत जायला आधी विरोध करणाऱ्या तिच्या कुटुंबीयांचा उर अर्चनाच्या कामगिरीने भरून आला. अर्चना भुवनेश्वरवरू न थेट हिमाचल येथे सुरू असलेल्या सराव शिबिराकरिता रवाना होणार असल्याचे ताई अढाव यांनी लोकमतजवळ सांगितले.

Web Title: Audghatke's gold medal offers 'Archie' light!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.