रेमडेसिविर इंजेक्शन वापराचे ‘ऑडिट’ सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:20 AM2021-05-21T04:20:01+5:302021-05-21T04:20:01+5:30
अकोला : जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी करण्यात येत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शन वापराचे ‘ऑडिट’ पाच वैद्यकीय ...
अकोला : जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी करण्यात येत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शन वापराचे ‘ऑडिट’ पाच वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूकडून गुरुवारपासून सुरू करण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन वापराच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप करण्यात येत आहे. परंतु वाटप करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर कोरोनाबाधित रुग्णांसाठी योग्य पद्धतीने होतो की नाही? राज्य शासनाच्या टास्क फोर्सने दिलेल्या सूचनेनुसार कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर होत आहे की नाही? रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करण्यात आलेल्या संबंधित रुग्णासाठी रेमडेसिविर इंजेक्शनची गरज होती की नाही? यासंदर्भात माहिती घेण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांमधील रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरासंदर्भात ‘ऑडिट’ सुरू करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय अंतर्गत पाच वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूकडून ‘ऑडिट’ सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी करण्यात येत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापराचे ऑडिट सुरू करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत पाच वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूकडून ऑडिट करण्यात येत असून, रेमडेसिविर इंजेक्शन वापराची माहिती घेण्याचे काम संबंधित चमूकडून सुरू करण्यात आले आहे.
डाॅ. नीलेश अपार
उपविभागीय दंडाधिकारी तथा नोडल अधिकारी (रेमडेसिविर इंजेक्शन)