खासगी रुग्णालयांचे ऑडिटिंग; दोन लाख रुपये केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 10:44 AM2021-06-09T10:44:54+5:302021-06-09T10:45:16+5:30
Auditing of private hospitals in Akola : मंगळवार, ८ जूनपर्यंत अकोला शहरातील आठ रुग्णालयांकडून दोन लाख एक हजार रुपयांची रक्कम संबंधित कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना परत करण्यात आली.
अकोला : कोरोना रुग्णांकडून जास्तीचे पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील खासगी कोविड रुग्णालयांचे जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या पथकांमार्फत ऑडिट करण्यात आले. त्यामध्ये मंगळवार, ८ जूनपर्यंत अकोला शहरातील आठ रुग्णालयांकडून दोन लाख एक हजार रुपयांची रक्कम संबंधित कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना परत करण्यात आली.
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली. दरम्यान, अकोला शहरातील काही खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून उपचार शुल्कापोटी जास्तीचे पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात शहरातील खासगी कोविड रुग्णालयांचे ऑडिट करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार, ऑडिटर्ससह पथकांची नेमणूक करण्यात आली. संबंधित पथकांकडून करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये कोरोनाबाधित रुग्णांकडून जास्तीचे पैसे घेतलेल्या शहरातील आठ खासगी रुग्णालयांना दोन लाख एक हजार रुपयांची रक्कम संबंधित आठ रुग्णांच्या नातेवाइकांना परत करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित खासगी कोविड रुग्णालयांना देण्यात आला.
कोरोनावर उपचार केली जाणारी शहरातील हॉस्पिटल्स
१२
जिल्ह्यातील नियुक्ते केलेले ऑडिटर्स
०८
बिल जास्त घेतल्याच्या तक्रारींची संख्या
१०
१० रुग्णालयांना नोटिसा
कोरोनाबाधित रुग्णांकडून जास्तीचे पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने अकोला शहरातील १० खासगी कोविड रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नोटिसा बजाविण्यात आल्या. त्यापैकी ८ जूनपर्यंत शहरातील आठ खासगी कोविड रुग्णालयांना वाढीव बिलापोटी घेतलेली दोन लाख एक हजार रुपयांची रक्कम परत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून पारित करण्यात आले.
आठ जणांना मिळाले पैसे परत
कोरोनाबाधित रुग्णांकडून जास्तीचे पैसे घेत असल्याच्या तक्रारी पाप्त झाल्याने शहरातील आठ खासगी कोविड रुग्णालयांचे ऑडिट करण्यात आले. त्यामध्ये उपचाराच्या बिलापोटी रुग्णांकडून जास्तीचे घेतलेले दोन लाख एक हजार रुपये संबंधित आठ कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना परत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे संबंधित आठही जणांना पैसे परत मिळाले.
कोरोनाबाधित रुग्णांकडून उपचार शुल्कापोटी जास्तीचे पैसे घेण्यात येत असल्याच्या १० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या ऑडिटर्समार्फत शहरातील खासगी कोविड रुग्णालयांचे ऑडिट करण्यात आले. त्यामध्ये ८ जूनपर्यंत आठ खासगी कोविड रुग्णालयांना दोन लाख एक हजार रुपये संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांना परत करण्याचे आदेश पारित करण्यात आले.
- संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.