ऑगस्ट महिन्याचे वेतन ‘ऑफलाइन’
By admin | Published: September 21, 2015 01:36 AM2015-09-21T01:36:39+5:302015-09-21T01:36:39+5:30
‘शालार्थ’ प्रणाली अद्यापही नादुरुस्तच असल्यामुळे शिक्षकांना ऑफलाइन वेतन मिळणार.
अकोला: तांत्रिक बिघाडामुळे 'शालार्थ' संगणक प्रणाली गत २0 दिवसांपासून बंद असल्याने राज्यातील शिक्षकांना ऑगस्ट महिन्याचे वेतन अद्यापही मिळाले नाही. गणेशोत्सव तसेच इतर सण-समारंभ पाहता शिक्षकांचे वेतन ऑफलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. एका महिन्याच्या वेतनाचा प्रश्न निकाला काढण्यात आला असला तरी शालार्थ संगणक प्रणाली अद्यापही बंदच असल्याने शिक्षकांच्या पुढील वेतनाचा प्रश्नही कायम आहे.
'शालार्थ' संगणक प्रणालीत गत पंधरा दिवसांपासून तांत्रिक बिघाड असल्याने वेतन देयके समाविष्ट करण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. त्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद आणि महानगरपालिका, नगरपालिका शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना ऑगस्ट महिन्यापासून विनावेतन काम करावे लागत आहे. एकीकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतन महिन्याच्या १ तारखेला अदा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, ह्यशालार्थह्ण संगणक प्रणाली बंद पडल्यामुळे शिक्षकांना सप्टेंबरमध्येही विनावेतनावरच दिवस भागवावे लागणार की काय? अशी चिंता शिक्षकांमध्ये पसरली आहे. सध्या गणेशोत्सव व इतर सण-समारंभाचा काळ असल्यामुळे विशेष बाब म्हणून राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन 'ऑफलाइन' घेण्याचा निर्णय शासनाने बुधवारी घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांसाठी सण समारंभाचा कालावधी आनंदाचा जाणार आहे. एका महिन्याच्या वेतनाचा प्रश्न शासनाने मार्गी लावला असला तरी अद्याप वेतनाबाबत निर्माण झालेली मूळ अडचणच सोडविण्यात आली नसल्याने यापुढेही वेतनाचा प्रश्न कायमच राहणार आहे.