शुभस्ते पंथे शीघ्रम्
By admin | Published: December 29, 2014 01:59 AM2014-12-29T01:59:41+5:302014-12-29T01:59:41+5:30
नागरी सत्कारात पालकमंत्र्यांकडून अकोलेकरांची अपेक्षा.
अकोला : अकोल्याला अनेक वर्षांपासून चातकासारखी विकासाची प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा आता पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे संपली आहे. पाटील यांच्या माध्यमातून आता अकोल्याच्या विकासाचा अनुशेष निश्चितच भरून निघणार आहे. आता ह्यशुभस्ते पंथ शीघ्रम्ह्ण या न्यायाने अकोल्याचा विकास होईल, अशी अपेक्षा अकोलेकरांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या नागरी सत्कारात व्यक्त केली.
रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. नानासाहेब चौधरी होते. यावेळी मंचावर मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, आमदार गोपीकिसन बाजोरिया, हरीश पिंपळे, माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, भाजपा महानगर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, डॉ. अर्पणा पाटील, माजी आमदार विठ्ठलराव पाटील, विजय जाधव, जि.प. सदस्य चंद्रशेखर पांडे, युवा सेना जिल्हाप्रमुख संग्राम गावंडे, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अजय तापडिया, बंडू देशमुख, मुकेश मुरुमकार, तरुण बगेरे, डॉ. किशोर मालोकार, गोपाल खंडेलवाल, अँड. मोतीसिंह मोहता, गोपाल खंडेलवाल, नगरसेवक गजानन गवई आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री रणजित पाटील यांचा सत्कार डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या हस्ते डॉ. अपर्णा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. हारतुर्याचा खर्च बाजूला सारून दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी १२ लाख १७ हजार ७१0 रुपयंचा निधी डॉ. रणजित पाटील यांना देण्यात आला. प्रास्ताविक गोपाल खंडेलवाल यांनी केले. मानपत्राचे वाचन अशोक ढेरे यांनी केले. संचालन डॉ. गजानन नारे यांनी केले.
*विकासपर्वाला साथ देणार्यांना सोबत घेऊ - पाटील
माझ्याकडे येणार्या पेशंटला बरं करण्यासाठी मला त्यांचे दु:ख समजून घ्यावे लागले. आता मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. मला आता समाजाची परीक्षा द्यायची आाणि त्यासाठी समाजाचे दु:ख मला समजून घ्यावे लागेल. प्रत्येकाचे दु:ख समजून घेण्यासाठी त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी यापुढील काळात करणार आहे, असे डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. सर्वांच्या सहकार्याने मी या पदावर पोहोचलो आहे. लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. मी राज्याचा मंत्री आहे. त्यामुळे मला सर्वांचेच हित जोपासणे गरजेचे आहे; परंतु पालकमंत्री या नात्याने अकोला व वाशिम या जिल्ह्याला निश्चितच झुकते माप राहील. अकोल्याच्या मातीनेच मला संवेदनशीलता, सहृदयता, मानवता, प्रेम शिकविले आहे. माझी नाळ शेतकर्यांशी जुळली आहे; ती कधीच तुटणार नाही हा विश्वास ठेवा. आमच्या विकासपर्वात जो साथ देईल, त्याला सोबत घेऊन व जो देणार नाही, त्याला बाजूला सारुन आता पुढे जाणार, असे पाटील यांनी सांगितले.