खड्ड्यामुळे उलटलेल्या आॅटोरिक्षाखाली दबल्याने चिमुकल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 06:05 PM2019-01-09T18:05:04+5:302019-01-09T18:06:55+5:30
अकोला : अकोट फैलमधील भारत नगरमध्ये रस्त्यावरील प्रचंड खड्डयांमूळे आॅटो उसळला अन एका घरासमोर असलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.
अकोला : अकोट फैलमधील भारत नगरमध्ये रस्त्यावरील प्रचंड खड्डयांमूळे आॅटो उसळला अन एका घरासमोर असलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या अपघातात मोहम्मद तौसीफ मोहम्मद आसीफ उमर या दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी नगरसेवकांचा घरावर मोर्चा नेताच ते पळून गेले. त्यानंतर आकोट फैल पोलिसांनी आॅटो चालकास अटक केली आहे.
अकोट फैलमधील भारत नगर परिसरातून एम एच ३० बीसी २२४९ क्रमांकाचा आॅटो भरधाव जात असतांना रस्त्यावरील खड्डयांवरून हा आॅटो उसळला. त्यानंतर घरासमोर बसुन असलेल्या मोहम्मद तौसीफ मोहम्मद आसीफ उमर या दोन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर सदरचा आॅटो कोसळला. या आॅटोखाली चिमुकला दबल्याने त्याचा काही क्षणातच मृत्यू झाला. सदर आॅटो घरातील साहित्य घेउन जात होता. आॅटो चालक मोहम्मद जफर मोहम्मद मुजफ्फर याला घटनेनंतर अकोट फैल पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. अकोट फैल पोलिसांनी आॅटो जप्त करून आॅटो चालक मोहम्मद जाफर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये नगरसेवकांच्या कामकाजाविषयी प्रचंड रोष निर्माण झाल्याने त्यांनी नगरसेवकांच्या घरावर मोर्चा नेताच नगरसेवक पळून गेले. त्यानंतर या नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा नेत प्रशासनाविरोधात नारेबाजी केली. नागरिकांचा रोष लक्षात घेता या ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नाल्यातील पाणी रस्त्यावर
आकोट फैल परिसरात बहुतांश भागातील नाल्यांची साफसफाई होत नसल्याने नाल्यातील पाणी रस्त्यावर येते. यामूळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून या खड्डयांमध्येही नाल्यातील पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकांना खड्डयांचा अंदाज येत नसल्यामूळे या परिसरात रोजच अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नगरसेवक पळाले अन मनपात मोर्चा
आकोट फैल भारत नगरातील नागरिकांनी या घटनेनंतर प्रचंड नारेबाजी करीत नगरसेवकांच्या घरावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न करताच नगरसेवक घर सोडून पळून गेले. या परिसरातील रस्ते आता तरी दुरुस्त करा अशी घोषनाबाजी करण्यात आली. त्यानंतर हा मोर्चा महापालिकेवर धडकला.